नांदेड-हैदराबाद आणि नांदेड-अहमदाबाद विमानसेवा लवकरच सुरू होणार

नांदेड-पुणे विमानसेवेची चर्चा सुरू असताना आता या विमानसेवेला पुणे विमानतळावर स्लॉट मिळत नसल्याने तुर्त ही विमानसेवा लांबणीवर पडली असली तरी आता नांदेडकरांसाठी बहुप्रतिक्षीत असलेल्या नांदेड-हैदराबाद आणि नांदेड-अहमदाबाद विमानसेवेला लवकरच सुरुवात होणार असूनही येत्या 31 मार्चपासून ही विमानसेवा नियमितपणे सुरू होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील उडाण या महत्वकांक्षी विमान सेवेतील नांदेड येथून अनेक विमानसेवा पूर्ववत सुरू होणार या चर्चाना आता पूर्णविराम मिळाला आहे. मात्र नांदेड ते पुणे ही विमानसेवा 22 मार्चपासून सुरू होणार अशा बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होत असताना पुणे विमानतळावर स्लॉट मिळत नसल्याने ही विमानसेवा लांबणीवर पडली आहे.

आता अहमदाबाद-नांदेड ही विमानसेवा प्रत्येक आठवड्यातील सोमवार, मंगळवार, गुरुवार आणि रविवारी सुरू होणार आहे. शिवाय याच वेळी प्रत्येक आठवड्यातील सोमवार, मंगळवार, गुरुवार, रविवारी हैदराबाद-नांदेड ही विमानसेवा सुरू होणार आहे. हैदराबाद येथून सकाळी 7.55 वाजता उडाण घेणारे विमान नांदेड येथे सकाळी 8.45 मिनिटांनी पोहचेल तर परतीच्या प्रवासात नांदेड येथून दुपारी चार वाजून 30 मिनिटाला उडाण घेणारे विमान हैदराबाद येथे सायंकाळी पाच वाजून वीस मिनिटाला पोहोचेल, अशी माहिती देण्यात आली आहे . या शिवाय बेंगलोर -नांदेड- दिल्ली, दिल्ली-जालिंदर ही विमानसेवाही सुरू होणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. मात्र याचे वेळापत्रक अद्यापपर्यंत प्रसिध्द करण्यात आले नाही.

त्यामुळे गेल्या अनेक महिन्यापासून नांदेडकर यांना जी विमानसेवेची प्रतीक्षा होती ही प्रतीक्षा आता लवकरच संपणार आहे. ही विमानसेवा सुरु व्हावी यासाठी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी प्रयत्न केले होते.सचखंड गुरुव्दाराला भेट देण्यासाठी येणार्‍या यात्रेकरुंसाठी नांदेड ते अमृतसर ही विमानसेवा सुरु होणे गरजेचे होते. मात्र या विमानसेवेबद्दल अधिकृत घोषणा अद्याप झाली नाही.

नांदेड ते पुणे ही विमानसेवा मात्र अडगळीत पडली असून, ती कधी सुरू होणार हे मात्र अनिश्चित आहे. 2017 मध्ये पंतप्रधान मोदी यांनी देशभरातील 22 विमान तळावरुन विमानसेवा सुरु होणार अशी घोषणा करुन त्याचे उद्घाटनही केले. मात्र नांदेडची अमृतसर सेवा तसेच नांदेड-हैद्राबाद-मुंबई ही विमानसेवा वर्षभरातच बंद पडली होती. आता नव्याने अहमदाबाद व हैद्राबाद ही विमानसेवा सुरु होणार असल्याने नांदेडकरांचा प्रवास जलद होणार आहे.