मराठवाडय़ात मतदानाला उन्हाचा चटका; सकाळी गजबजाट, दुपारी शुकशुकाट, उन्हं कलल्यावर पुन्हा रांगा लागल्या

मतदानाच्या दुसऱया टप्प्यात मराठवाडय़ातील नांदेड, परभणी, हिंगोलीसह विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ-वाशीम, वर्धा या आठ मतदारसंघांत शुक्रवारी मतदान घेण्यात आले. कडक उन्हाचा मतदानावर चांगलाच परिणाम झाला असून मतदानाची टक्केवारी कमी झाली आहे. मतदान संपेपर्यंत मराठवाडय़ात सरासरी 60 टक्के मतदान झाले.

आधी मतदान मग लग्न

26 एप्रिल ही लग्नाची दाट तिथी होती. नांदेड, परभणी तसेच हिंगोलीत आजच्या मुहूर्तावर अनेक लग्ने लागली. मात्र वऱहाडय़ांनी अगोदर मतदान नंतर लग्न असा मुहूर्त साधला. नांदेड जिल्हय़ातील सायफळ येथील अंकुश गावंडे-पाटील याचे लग्न इंद्रावली येथील पूजा हिच्यासोबत झाले. लग्नाला निघण्यापूर्वी वधू-वरासह इतर वऱहाडय़ांनीही मतदान उरकून घेतले. मुदखेड येथील पूनम आणि कृष्णा श्रीरामवार या नवदांपत्यानेही नांदेड लोकसभेसाठी आपला मतदानाचा हक्क बजावला. उटी ब्रह्मचारी येथील गोपाल पोहकर याचा विवाह सोहळा आमला येथे होणार होता.

कॅमेऱयाची करडी नजर

बुलढाणा लोकसभा निकडणुकीसाठी जिल्हय़ात आज सरासरी 60 टक्के मतदान झाले. या वेळी जिल्हय़ातील खामगाव आणि भालेगाव येथील मतदान केंद्रांवर ईक्हीएम मशीन बिघडल्याने काही काळ मतदान थांबवण्यात आले होते. त्यानंतर सर्वत्र शांततेत मतदान पार पडले. या वेळी संवेदनशील मतदान केंद्रांवर तगडा पोलीस बंदोबस्त तसेच कॅमेऱयांची करडी नजर होती, तर येथील प्रशासकीय इमारतीमध्ये असलेल्या एका मतदान केंद्राकरील ईक्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्याने सुमारे अर्धा तास मतदान प्रक्रिया थांबवण्यात आली होती.

सखी मतदान केंद्राची सजावट

हिंगोली शहरातील सिटीक्लब मैदानावर सखी केंद्र उभारण्यात आले. या केंद्राची सर्व जबाबदारी महिला कर्मचाऱयांवर सोपवण्यात आली होती. या केंद्राची सजावट गुलाबी रंगाने करण्यात आली होती. मतदान कर्मचाऱयांनीही गुलाबी रंगाचाच पेहराव केला होता.

नांदेड दक्षिण, नांदेड उत्तर, मुखेड, नायगाव, भोकर, देगलूर या सहाही विधानसभा मतदारसंघात सकाळी मतदानाचा चांगला वेग बघावयास मिळाला. माध्यान्ह काळात मात्र अनेक मतदान केंद्र ओस पडली. उन्हं कलल्यानंतर मतदारांनी पुन्हा रांगा लावल्या.

किरकोळ अपवाद वगळता शांततेत मतदान

यवतमाळ-वाशीम मतदारसंघात किरकोळ अपवाद वगळता मतदान शांततेत पार पडले. उन्हाचा चटका बसण्याअगोदरच मतदारांनी केंद्रावर गर्दी केली. दुपारी तापमान वाढताच मतदान केंद्रांवर शुकशुकाट पसरला. उन्हं उतरताच मतदान केंद्रे पुन्हा मतदारांनी गजबजून गेली. अनेक मतदान केंद्रांवर वेळ संपून गेली तरी रांगा कायम होत्या. येथे साधारण 55 टक्के मतदान झाले.

बिग बॉसफेम शिव ठाकरे याने आपल्या आजीसोबत मतदानाचा हक्क बजावला.