धाराशीवमध्ये तानाजी सावंतांच्या गुंडांचा धुडगूस, मतदान केंद्राजवळ शिवसैनिकाची भोसकून हत्या

धाराशीव मतदारसंघात पराभव समोर दिसत असल्यामुळे ‘खेकडा’ फेम मंत्री गद्दार तानाजी सावंत बिथरले आहेत. याच वैमनस्यातून भूम तालुक्यातील पाटसावंगी येथे सावंतांच्या कार्यकर्त्याने शिवसैनिकाला मतदान केंद्राच्या आवारातच भोसकले. या कार्यकर्त्याचा घटनास्थळावरच तडफडून मृत्यू झाला. या घटनेनंतर तणाव निर्माण झाला आहे.

मतदानावर कोणताही परिणाम होऊ नये म्हणून पोलिसांनी चक्क हा हल्ला प्रेमप्रकरणातून झाल्याचा जावईशोध लावला. एवढेच नाहीतर मतदान केंद्राच्या आवारात काहीच घडले नाही असा दावा तर केलाच पण रात्री उशिरापर्यंत गुन्हाही नोंदवला नाही. या घटनेची सखोल चौकशी करून अपराध्यांना अटक करण्यात यावी अशी मागणी महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी केली आहे.

धाराशिव मतदारसंघात मंगळवारी मतदान घेण्यात आले. मोदीविरोधाचे वारे धाराशिवमध्येही वाहत आहेत. महाविकास आघाडीचे ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना मिळणारा उदंड प्रतिसाद पाहून तानाजी सावंतांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. या विमनस्क अवस्थेतच त्यांनी राजेनिंबाळकर यांच्यावर अर्वाच्च शब्दांत टीका केली. सावंत यांच्याबरोबरच त्यांचे चेलेचपाटेही बिथरले आहेत. त्याचेच पडसाद आज भूम तालुक्यातील पाठसावंगी येथे बघायला मिळाले.

भूम तालुक्यातील पाठसावंगी येथे दोन मतदान केंद्र आहेत. जिल्हा परिषद शाळेतील मतदान केंद्रावर सकाळी सात वाजता मतदान सुरू झाले. मतदान सुरू असतानाच तानाजी सावंत यांचा कार्यकर्ता गौरव उर्फ लाल्या अप्पा नाईकनवरे हा तेथे आला. मतदान केंद्रावर असलेला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा कार्यकर्ता भारत पाटील याच्याशी त्याने वाद घातला. हे भांडण सोडवण्यासाठी शिवसैनिक समाधान नानासाहेब पाटील (31) आणि शंकर शरद शिंदे पाटील हे मध्ये पडले. थोडी बाचाबाची झाली. इतरांनी मध्यस्थी केल्याने हा वाद तेथेच थांबला. समाधान पाटील, शंकर शिंदे हे मतदान केंद्राच्या आवारातून बाहेर पडत असतानाच घरातून चाकू घेऊन आलेल्या गौरवने हल्ला केला. या हल्ल्यात समाधान रक्तबंबाळ अवस्थेत पडला. या घटनेमुळे मतदान केंद्रावर एकच खळबळ उडाली.

शिवसैनिक असलेला समाधान पाटील हा मध्यमवर्गीय कुटुंबातील असून गावात त्याचे मावळा नावाचे छोटेसे हॉटेल आणि किराणा दुकान आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुलगे, एक मुलगी असा परिवार आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच मतदान सुरू असतानाही ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी बार्शी येथे रुग्णालयात जाऊन समाधानच्या कुटुंबाची भेट घेतली. जखमी शंकर शिंदेलाही ते भेटले.

पोलिसांनी मृत समाधानला बार्शीला हलवले

रक्तबंबाळ अवस्थेत असलेल्या समाधानचा घटनास्थळावरच मृत्यू झाला. परंतु या घटनेचे मतदार संघात पडसाद उमटू नयेत म्हणून पोलिसांनी समाधानला तातडीने बार्शीला हलवले. त्यानंतर भूमचे पोलीस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी यांनी वैयक्तिक कारणातून ही घटना घडली असून राजकारणाशी त्याचा काही संबंध नसल्याचे पत्रक काढले. हल्ला केल्यानंतर गौरव कुटुंबासह पोलिसांच्या डोळय़ादेखत फरार झाला. परंतु तानाजी सावंतांच्या दबावामुळे पोलिसांनी हाताची घडी घातली. यामुळे पोलिसांच्या विरोधात संतापाची लाट उसळली आहे.