Lok Sabha Election 2024 : तिसऱ्या टप्प्याला हिंसेचे गालबोट, खून, दमदाटी, हाणामारी, ईव्हीएमही पेटवले; 5 मृत्यू

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱया टप्प्याला हिंसेचे गालबोट लागले. खून, हाणामारी, दमदाटीच्या घटना घडल्याच पण माढा मतदारसंघात एका तरुणाने ईव्हीएम पेटवून दिल्याने खळबळ उडाली. विविध घटनांमध्ये देशभरात पाचजणांचा मृत्यू झाला. त्यात धाराशीव मतदारसंघात राजकीय सूडातून शिवसैनिकाची हत्या झाल्याने तणाव निर्माण झाला आहे
.
या टप्प्यात अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली असून महाराष्ट्रातील 11 मतदारसंघांत सरासरी 61.44 टक्के मतदान झाले. देशभरात दहा राज्ये आणि एका केंपेंद्रशासित प्रदेशातील मिळून लोकसभेच्या 93 जागांसाठी सरासरी 63.77 टक्के मतदानाची नोंद झाली. पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक 73.93 टक्के मतदान झाले.

महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्रातील 7, कोकण आणि मराठवाडय़ातील प्रत्येकी 2 अशा एकूण 11 लोकसभेच्या जागांसाठी मतदान पार पडले. धाराशीवमध्ये मतदान पेंद्राबाहेर झालेल्या हाणामारीत एकाचा मृत्यू झाला तर सर्वाधिक प्रतिष्ठsच्या बारामती, माढा, सोलापूर मतदारसंघात मतदानादरम्यान बाचाबाची झाली. सांगोला तालुक्यातील बादलवाडी येथे मतदान पेंद्रावर एका तरुणाने ईव्हीएम मशीनच पेटवल्याची घटना घडली.

सांगोल्यात तरुणाने ईव्हीएमला आग लावली

माढा मतदारसंघातील सांगोला तालुक्यातील बागलवाडी येथील मतदान पेंद्रावर तरुणाने चक्क ईव्हीएम मशीनला आग लावली. ईव्हीएम पेट घेतल्याचे लक्षात येताच मतदान पेंद्रावर खळबळ उडाली. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी अर्धवट जळालेले ईव्हीएम ताब्यात घेऊन तपासणी करण्याचे आदेश दिले.

माढय़ात पैसे वाटपावरून हाणामारी

माढा लोकसभा मतदारसंघात कोरेगाव तालुक्यातील पिंपोडे येथे काही लोक सोमवारी रात्री पैसे वाटत होते. यावरून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. भाजप उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासाठी हे पैसे वाटप केले जात होते, असा आरोप महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केला.

हातकणंगले मतदारसंघात हाणामारी; तणाव

हातकणंगले मतदारसंघात वाळवा तालुक्यातील साखराळे येथे दोन गटात सकाळी 11.30 वाजता जोरदार हाणामारी झाली. मतदानाच्या ठिकाणी बोगस प्रतिनिधी असल्याच्या संशयावरून महाविकास आघाडीचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार सत्यजित पाटील आणि महायुतीतील मिंधे गटाचे धैर्यशील माने यांच्या समर्थकांत वादावादी होऊन हाणामारी झाली.

मतदान रांगेत वृद्धाचा हृदयविकाराने मृत्यू

कोल्हापुरात उत्तरेश्वर पेठेतील मतदान केंद्रावर रांगेत उभे असलेले महादेव श्रीपती सुतार (वय 69) हे चक्कर येऊन कोसळले. नागरिक आणि कार्यकर्त्यांनी तातडीने सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याने डॉक्टरांनी सांगितले.

देशात सरासरी 63 टक्के मतदान

– लोकसभा निवडणुकीच्या तिसऱया टप्प्यात सायंकाळी पाच वाजेपर्यंत देशभरात 63 टक्के मतदान झाले. 11 राज्यांतील आणि पेंद्रशासित प्रदेशांतील तब्बल 93 मतदारसंघांत मतदान झाले. पश्चिम बंगालमध्ये हिंसाचाराच्या तुरळक घटना वगळता मतदान शांततेत पार पडले.

दोन निवडणूक कर्मचाऱयांचा मृत्यू

कर्नाटकात निवडणुकीच्या डय़ुटीवर असताना दोन कर्मचाऱयांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. यात एक सरकारी शाळेतील शिक्षक होता तर दुसरा सहाय्यक कृषी अधिकारी होता.
– पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादमध्ये तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार राडा झाला. याबाबत दोन्ही बाजूंकडून आयोगाकडे तक्रार करण्यात आली.

राज्यातील मतदानाची टक्केवारी

मतदारसंघ 2019 2024
लातूर 62.44 60.18
सांगली 65.92 60.95
बारामती 61.82 56.07
हातकणंगले 70.06 68.07
कोल्हापूर 70.86 70.35
माढा 63.77 62.17
धाराशीव 63.76 60.91
रायगड 62.17 58.10
रत्नागिरी-सिंधुदुर्ग 61.99 59.23
सातारा 60.47 63.05
सोलापूर 58.67 57.61