मोदींकडून परदेशातील काळय़ा पैशांचे तोडपाणी; काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांचा आरोप

prithviraj-chavan

परदेशी बँकांमधील काळा पैसा हिंदुस्थानात आणून प्रत्येकाच्या बँक खात्यामध्ये 15 लाख रुपये जमा करण्याचे आश्वासन देऊन नरेंद्र मोदी 2014 मध्ये सत्तेवर आले. त्यानंतर केंद्र सरकारकडे विविध संस्थांच्या माध्यमातून स्विस बँक आणि परदेशात गुंतवलेल्या काळय़ा पैशाची सर्व माहिती आली. आजही केंद्र सरकारकडे याची माहिती आहे. तरीही मोदी सरकारने आजवर संबंधितांवर कारवाई केली नाही. याचा अर्थ यामध्ये कुठेतरी तोडपाणी झाली आहे, असा आरोप माजी मुख्यमंत्री, काँग्रेसचे प्रदेश प्रचारप्रमुख पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपवर केला.

पुण्यात महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत ते बोलत हेते. यावेळी पुणे लोकसभेचे उमेदवार रवींद्र धंगेकर, माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे उपस्थित होते.

चव्हाण म्हणाले, परदेशातील काळा पैसा 100 दिवसांत परत आणू असे आश्वासन जनतेला दिले होते, मात्र तो जुमला होता. पेंद्र सरकारकडे काळा पैशाबाबतची माहिती आहे, पण कारवाई झाली नाही. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या काळातील विकास दर जेवढा होता तेवढा विकास दर मोदींच्या काळात राहिला असता तर आपली अर्थव्यवस्था आज जगात तिसऱ्या नंबरवर गेली असती. आज देशावर 206 लाख कोटी कर्ज आहे. निर्यातबंदी घातल्यामुळे भाव पडले आहेत. डिझेल-पेट्रोलचा भाव 35 रुपये करण्याचे आश्वासन दिले होते. याशिवाय शंभर शहरे स्मार्ट सिटी करण्याचे आश्वासन दिले, मात्र त्याचे काय झाले याचा अहवाल मोदींनी द्यावा, असेही चव्हाण म्हणाले.