वर्ष झाले… मोदी आले, राहून गेले, पण 80 लाखांचे बिल थकवले

देशवासीयांना सच्चाई आणि इमानदारीचे डोस देणाऱया खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हैसूर दौऱयात हॉटेल ‘रेडिसन ब्ल्यू प्लाझा’चे तब्बल 80.6 लाखांचे बिल वर्ष उलटून गेले तरी दिले नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे संबंधित हॉटेलने मोदींना कायदेशीर कारवाईचा इशाराही दिला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरण आणि पर्यावरण हवामान बदल मंत्रालयाकडून आयोजित करण्यात आलेल्या ‘प्रोजेक्ट टायगर’ला 50 वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित कार्यक्रमासाठी म्हैसूरला गेले होते. यावेळी पंतप्रधानांनी म्हैसूरच्या ‘रेडिसन ब्ल्यू प्लाझा’ या आलिशान हॉटेलमध्ये मुक्काम केला होता, मात्र या मुक्कामाचे, खाण्या-पिण्याचे बिल मोदींनी अद्याप भरलेले नाही. याबाबत वारंवार पाठपुरावा करूनही प्रतिसाद मिळत नसल्याने संबंधित हॉटेल प्रशासनाने मोदींना कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे. ‘द हिंदू’ने याबाबत वृत्त प्र्रसिद्ध केले आहे.

तीन कोटींचा खर्च सहा कोटींवर

राज्य वन विभागाने आयोजित केलेल्या दौऱयासाठी सुरुवातीला तीन कोटींचे बजेट निश्चित करण्यात आले होते. यासाठी वन विभागाला 100 टक्के पेंद्रीय सहाय्य देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र अतिशय कमी वेळात आयोजित केलेल्या कार्यक्रमाचा खर्च 6.33 कोटींवर गेला आहे. यासाठी पेंद्राकडून तीन कोटी देण्यातही आलेत, मात्र राज्य वन विभाग, पर्यावरण आणि वन मंत्रालयात झालेल्या आर्थिक देवाणघेवाणीनंतरही अद्याप 3.33 कोटी देण्यात आलेले नाहीत. पंतप्रधानांच्या या दौऱयासाठी अचानक अनेक गोष्टींचा समावेश करण्यात आला. त्यामुळे या कार्यक्रमाचा खर्च वाढल्याचे समोर आले आहे.

– ‘रेडिसन ब्ल्यू प्लाझा’च्या महाव्यवस्थापकांनी 21 मे 2024 रोजी उपवनसंरक्षक बसवराजू यांना पत्र लिहून बिलाची आठवण केली आहे.
– आता 18 टक्के प्रतिवर्ष व्याज दराने पैसे भरा. व्याज म्हणून 12.09 लाख रुपये अधिकचे भरा, असे पत्रात नमूद केले आहे. 1 जूनपर्यंत बिल न भरल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा हॉटेलने दिला आहे.