Election 2024 : अमरावतीमधून नवनीत राणांना उमेदवारी जाहीर होताच बच्चू कडूंचा संताप; भाजपला देणार निकालातून उत्तर

ravi rana navneet rana bacchu kadu

 

Lok Sabha Election 2024 :

अमरावती लोकसभा मतदारसंघातून भाजपने नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपने नवनीत राणांना उमेदवारी जाहीर करताच माजी मंत्री आणि प्रहार जनशक्‍ती पक्षाचे आमदार बच्‍चू कडू यांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच नवनीत राणांविरोधात दंड थोपटले आहेत. नवनीत राणा यांना आपला विरोधक कायम आहे. आणि आपण त्यांचा प्रचार करणार नाही, अशी भूमिका बच्चू कडू यांनी घेतली आहे. यासोबतच बच्चू कडू यांनी भाजपवरही कडाडून टीका केली आहे.

भाजपने नवनीत राणा यांना उमेदवारी दिल्यावर आमदार बच्चू कडू यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. भाजपने आपलं काम केलं आहे. आता आम्ही आमचं काम करू. आमची भूमिका स्पष्ट आहे. नवनीत राणा यांना आमचा विरोध कायम राहील. महायुतीला आणि भाजपला आमची गरज नाहीये, हे लक्षात आलं तर आम्ही अमरावतीत आमचा उमेदवार उभा करू, असा इशाराही बच्चू कडू यांनी दिला आहे.

आता नाराजी मांडण्याची गरज नाही. विषय संपला आहे. त्यांनी (रवी राणा-नवनीत राणा) अतिशय व्यक्तिगत आणि खालच्या पातळीवर आमच्यावर टीका केली. यामुळे आमचे कार्यकर्ते त्यांच्यासाठी काम करू शकत नाही. आम्ही काम केलं तर आमचाच पक्ष अडचणीत येऊ शकतो. यामुळे निवडणुकीत नवनीत राणांचा प्रचार आम्ही करणार नाही, असे बच्चू कडू म्हणाले.

वेळ पडल्यास अमरावतीमधून आमचा उमेदवार उभा करू. उमेदवार देऊन किंवा न देऊन फायदा होतो की नाही, हे तपासू. आमचा उमेदवार उभा केला तर ते नवनीत राणांना पोषक ठरू शकतं की त्यांना पाडू शकतो. किंवा थेट पाठिंबा देऊ शकतो का? हे तपासून पाहू. अमरावतीकरांचा कौल नवनीत राणांच्या विरोधातच राहील. सतत आरोप आणि विकासकामांचे श्रेय घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. रवी राणांनी तर भाजपचंच कार्यालय फोडलं होतं, असे ते पुढे म्हणाले.

नवनीत राणांची उमेदवारी जाहीर करण्यापूर्वी महायुतीकडून आपल्याशी कुठलीही चर्चा करण्यात आली नाही. त्यांना कदाचित गरज वाटली नसावी. भाजपने आपल्याला विचारात न घेता परस्पर निर्णय घेतला. हा भाजपचा मूळ स्वभाव आहे. यामुळे आमची नाराजी निवडणुकीच्या निकालातून दाखवून देऊ, असा थेट इशारा आमदार बच्चू कडू यांनी भाजपसह महायुतीला दिला आहे.