व्हेट्टोरी हैदराबादचा प्रशिक्षक

आयपीएलच्या नव्या हंगामासाठी सनरायझर्स हैदराबाद संघाने मोर्चेबांधणी करायला सुरुवात केली आहे. गेल्या आयपीएलमध्ये वेस्ट इंडीजचा अनुभवी खेळाडू ब्रायन लाराच्या प्रशिक्षणाखाली संघाची कामगिरी अत्यंत निराशाजनक झाली होती. त्यामुळे हैदराबाद संघाने ब्रायन लाराची हकालपट्टी करीत न्यूझीलंडच्या डॅनियल व्हेट्टोरीची संघाचा नवा प्रशिक्षक म्हणून घोषणा केली आहे.

गत आयपीएलमध्ये हैदराबाद सनरायझर्स संघाने 14पैकी 10 साखळी सामने गमावले होते. या गचाळ कामगिरीमुळे मुख्य प्रशिक्षक ब्रायन लाराला नारळ देण्याचा निर्णय संघमालकाने घेतला. संघ व्यवस्थापनाच्या वतीने सोमवारी सोशल मीडियावर ब्रायन लाराचे आभार मानण्यात आले. याचबरोबर सनरायझर्स हैदराबादने नवे प्रशिक्षक म्हणून डॅनियल व्हेट्टोरीची निवड केल्याची माहितीही देण्यात आली. सनरायझर्स हैदराबादने आपल्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवर न्यूझीलंडच्या माजी कर्णधाराचा फोटो शेअर केला. ‘न्यूझीलंडचा दिग्गज खेळाडू ऑरेंज आर्मीमध्ये मुख्य प्रशिक्षक म्हणून रुजू होणार आहे’ असे ट्विटरवर लिहिण्यात आले आहे. व्हेट्टोरीने यापूर्वी 2014 ते 2018 या कालावधीत आरसीबीचे प्रशिक्षक पद भूषवले होते.