जगभरातून काही बातम्या…

केस्ट्रेलच्या हेलिकॉप्टरला ब्रेक

केदारनाथ येथे हेलिकॉप्टरच्या इमर्जन्सी लँडिंगनंतर विमान कंपनीने केस्ट्रेल कंपनीच्या हेलिकॉप्टर उड्डाणांना परवानगी नाकारली आहे. नागरी उड्डाण विभागाने या घटनेचा तपास पूर्ण होईपर्यंत या कंपनीच्या उड्डाणांना केदारघाटात उड्डाण करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे केदारनाथमधील भाविकांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. केदारघाटीमधील हवाई प्रवास केवळ 10 मिनिटांचा आहे, परंतु हा प्रवास प्रवाशांना श्वास रोखून धरायला लावणारा आहे. अनेकदा हवामान खराब असल्याने पायलटला इमर्जन्सी लँडिंग करावे लागते.

रॅगिंग भोवले; चार विद्यार्थी 25 वर्षांसाठी निलंबित

गुजरातच्या अहमदाबाद येथील एका मेडिकल कॉलेजमधील चार विद्यार्थ्यांना कॉलेजमधून काढून टाकण्यात आले आहे. ज्युनियर विद्यार्थ्यांसोबत रॅगिंग केल्याच्या आरोपाखाली या विद्यार्थ्यांना बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला असून यातील दोन विद्यार्थ्यांचे करिअरच बरबाद झाले असून त्यांना 25 वर्षांसाठी निलंबित केले आहे. मणिनगर येथील अहमदाबाद नगर निगमच्या एएमसी मेडिकल एज्युकेशन ट्रस्टद्वारे हे मेडिकल कॉलेज सुरू आहे. कॉलेजच्या डीन डॉ. दीप्ती शाह यांनी मास्टर ऑफ सर्जरीच्या चार विद्यार्थ्यांचे निलंबन केल्याचे सांगितले.

इस्रायलवर दबाव, राफातील हल्ले थांबवा

इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध अद्याप सुरू आहे. इस्रायलने दक्षिण गाझातील राफा शहरातील लष्करी कारवाई तत्काळ थांबवावी, असे निर्देश संयुक्त राष्ट्राच्या न्यायालयाने दिले आहेत. इस्रायलकडून गाझामध्ये सुरू असलेले हल्ले थांबवण्यासाठी जगभरातून दबाव वाढत आहे. इस्रायलचा मित्र समजला जाणाऱया अमेरिकेनेही या हल्ल्यांवरून तीव्र नाराजी व्यक्त केली. या हल्ल्यामुळे निर्वासितांची स्थिती गंभीर बनली आहे. तीन युरोपीय देशांनी पॅलेस्टाईनला वेगळे राष्ट्र म्हणून मान्यता दिली आहे. हमासच्या काही अधिकाऱयांना तातडीने अटक करावी, अशी विनंतीही आंतरराष्ट्रीय न्यायालयातील मुख्य विधिज्ञांनी इस्रायली नेत्यांसोबतच्या बैठकीत केली. हे युद्ध थांबवण्यासाठी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्यावर दबाव वाढवला जात आहे.

फिलीपिन्सींची नाडी हिंदुस्थानी डॉक्टरांच्या हाती

हिंदुस्थानातील सुमारे दोन हजार हिंदुस्थानी विद्यार्थी दरवर्षी मेडिकलच्या पदवी शिक्षणासाठी फिलीपिन्समध्ये जातात. आता या विद्यार्थ्यांना फिलीपिन्समध्येच प्रॅक्टिस करण्याची संधी मिळणार आहे. तेथील सरकारने वैद्यकीय शिक्षण आणि प्रॅक्टिससंदर्भातील नियमात काही बदल केले आहेत. या अंतर्गत दुसऱया देशातील मेडिकलच्या विद्यार्थ्यांना मेडिकल प्रॅक्टिसचा परवाना देण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता फिलीपिन्समध्ये प्रॅक्टिस करण्याची परवानगी मिळणार आहे. यापूर्वी रशिया, बेलारूस आणि जॉर्जिया देशांनीही इतर देशांतील विद्यार्थ्यांना मेडिकल प्रॅक्टिस करण्याची परवानगी दिली होती.