मुंबईच्या लोकल ट्रेनवर आता ‘बॅटमॅन’चं लक्ष

मुंबईची लाइफलाइन असलेल्या उपनगरीय लोकल गाड्या आणि स्थानकांवर सायंकाळच्या वेळी विनातिकीट प्रवाशांची संख्या वाढल्याचं समोर आलं आहे. याचं कारण रात्री 8 नंतर तिकीट तपासनीस मोठ्या प्रमाणात गैरहजर असतात. या समस्येचे निराकरण करण्यासाठी, पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागाने रात्रीच्या वेळी लोकल ट्रेनमध्ये आणि स्थानकांवर तिकीट तपासणी करण्यासाठी एक पूर्णवेळाचं पथक तयार केलं आहे. या पथकाला ‘बॅटमॅन स्क्वाड’ असं नाव देण्यात आलं आहे, ज्याचा अर्थ ‘बी अवेअर टीटीई मॅनिंग ॲट नाईट’ आहे.

11 मार्चच्या रात्री ‘बॅटमॅन’ पथकाची गस्त सुरू झाली आहे. ‘बॅटमॅन’ पथकाची मोहीम सुरू झाली तेव्हापासून, अंदाजे 2,500 विनातिकीट प्रवाशांना दंड भरावा लागला आहे. यातून रेल्वेला सुमारे 6.50 लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे.

तिकिटाशिवाय प्रवासाची सवय मोडून काढणं आणि तिकीट खिडकीवरील कमाई वाढीस लागणं ही बॅटमॅन पथकाची प्राथमिक जबाबदारी आहे. असे असली तरी, त्यांना रात्रीच्या वेळी स्थानकांवर होणाऱ्या गोष्टींवर लक्ष ठेवण्याचंही काम दिलं जातं. तिकीट तपासनीस आता रात्रीच्या वेळी महिलांच्या डब्यात तपासणी करतील. या सतर्कतेमुळे महिला प्रवाशांना सुरक्षिततेची भावना मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

मुंबई लोकलच्या एसी डब्यांमध्ये जास्त गर्दी

तिकीट नसलेल्या आणि सामान्य तिकीट असलेले प्रवासी रात्रीच्या वेळी एसी लोकलमधून प्रवास करतात त्यामुळे एसी लोकलच्या प्रवाशांना त्रास होतो. सामान्य दराच्या पाच पटीने तिकीट खरेदी करणाऱ्या प्रवाशांना तिकीट नसलेल्या व्यक्तींमुळे होणाऱ्या गर्दीमुळे असंख्य अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दररोज तक्रारी येत आहेत, ज्यामुळे या गंभीर समस्येचे निराकरण करण्यासाठी रेल्वेने रात्रीच्या वेळी ‘बॅटमॅन’ पथक तैनात केलं आहे.