फी न भरल्याने अनाथ विद्यार्थिनीची छळवणूक, शाळा सोडल्याचा दाखला देण्यास नकार

प्रातिनिधिक फोटो

चंद्रपूर जिल्ह्यातील एका अनाथ विद्यार्थिनीला हीन वागणूक देण्यात आली आहे. फी भर, नाहीतर शाळा सोडल्याच्या दाखला देणार नाही असं शाळेने तिला बजावलं. ही मुलगी चांदा पब्लिक स्कूलमध्ये शिकत असून तिला दहावीत 84% गुण मिळाले आहेत. पुढील शिक्षणासाठी तिने शाळा प्रशासनाला लिव्हींग सर्टिफिकेट देण्याची विनंती केली होती. 70 हजार रुपये शुल्क भर त्यानंतरच दाखला मिळेल असं या मुलीला सांगण्यात आलं. ही बाब आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या कानावर गेली असता त्यांनी शाळेत घुसत आंदोलन केलं होतं.

या मुलीच्या आई – वडिलांचे चार वर्षांपूर्वी निधन झाले आहे. ही मुलगी तिच्या काकांकडे राहाते. फी देणं परवडत नाही असं काकांनी सांगितल्याने या मुलीला फी भरणं अशक्य झालं होतं. पूर्वी या मुलीला दिलासा देऊ असं शाळा प्रशासनाने सांगितले होते. या विद्यार्थिनीची शैक्षणिक प्रगती ही उत्तम आहे, तिला गुणही चांगले मिळालेले आहेत यामुळे तिची फी माफ करून तिला दाखला देण्यात येईल असे शाळा संचालिका स्मिता जीवतोडे यांनी सांगिलते होते. मात्र त्यांनी अचानक यु-टर्न घेत दाखला देण्यास नकार दिला. फी भरत नाही तोवर दाखला देणार नाही अशी शाळा प्रशासनाने भूमिका घेतली आहे.