‘सत्यमेव जयते’चे रामराज्य आणण्यासाठी आमची लढाई सुरू; आदित्य ठाकरे यांचा निर्धार

देशात सध्या हुकूमशाहीचे राज्य आहे. संविधान बदलून जनतेचे हक्क हिरावण्याचे डाव रचले जात आहेत. या हुकूमशाही प्रवृतीविरोधात आमची लढाई असून देशात सत्यमेव जयतेचे रामराज्य आणण्यासाठी आमची लढाई सुरू आहे, असा निर्धार शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवसेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला. न्यूज 18 या वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

आज आमच्याकडे पक्ष, चिन्ह नसेल, पण जनता आमच्या बाजूने आहे, त्यामुळे जनतेचा समस्या सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावावरच जनतेचा विश्वास आहे. जनतेचे हे प्रेम आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. निवडणूक रोखे घोटाळा हा देशातील आतापर्यंतचा सर्वात मोठा घोटाळा आहे. जनतेचे लक्ष या मुद्द्यापासून विचलीत करण्यासाठी त्याच काळात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली. तरीही जनता चंदा दो, धंदा लो याबाबत प्रश्न विचारत आहे. भाजपने 10 वर्षे खोटे बोलून सत्ता मिळवली आहे. ते देश हुकूमशाहीकडे नेत आहेत. त्यामुळे जनता भाजपविरोधात एकवटली आहे.

भाजपच्या दबावाला काहीजण बळी पडले. भाजपने भीती दाखवत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस फोडली. काँग्रेसमधील भ्रष्टाचाऱ्यांना पक्षात घेतले. भाजपने दबावतंत्र वापरताच डरपोक पळाले. मात्र, ज्यांना कर नाही त्यांनी जर का, अशा वृत्तीचे लोक भाजपचा मुकाबला करत आहेत. शिवसेना नेते, खासदार संजय राऊत, अनिल देशमुख यांना तुरुंगात टाकण्यात आले. अमोक किर्तीकर यांच्यावरही कारवाई करण्यात येत आहे. मात्र, आम्ही त्याचा सामना करत आहोत.

ईडी, सीबीआय आणि इन्कमटॅक्स हे एनडीएच्या मित्रपक्षाप्रमाणे काम करत आहेत. भाजपची हुकूमशाही आणि तपासयंत्रणांचा कारवायांमुळे देशाची बदनामी होत आहे. भाजपचे फोडाफोडीचे राजकारण राज्यासह देशातही दिसून येत आहे. द्वेश पसरवत दिशाभूल करत सत्ता टिकवण्याचे भाजपचे राजकारण सुरू आहे. इतर पक्षातील भ्रष्टाचाऱ्यांना पक्षात घेण्यात येत आहे. 10 वर्षे सत्तेत असून ते आमच्यावर आरोप करत आहेत. राजकारणाचा स्तर यांनी घसरवला आहे.

महाराष्ट्रावर याआधीही आक्रमणे झाली आहेत. आता हे वेगळ्या प्रकारचे आक्रमण आहे. येथील अनेक उद्योगधंदे गुजरातमध्ये जात आहेत. आर्थिक आक्रमण करत येथील सरकार पाडायचे आणि येथील भूमिपुत्रांचे रोजगार गुजरातला पळवण्याचे काम सुरू आहे. क्रिकेट विश्वचषकाचा अंतिम सामना मुंबईत होण्याची गरज होती. मात्र, तोदेखील गुजरातमध्ये घेण्यात आला. तो कोणासाठी गुजरातमध्ये घेण्यात आला, असा सवालही आदित्य ठाकरे यांनी केला.

10 वर्षे केंदात त्यांची सत्ता आहे तर, नोटबंदी, जीएसटी यांचा देशाला काय फायदा झाला, जम्मू कश्मीरमधून 370 कलम हचवून काय फायदा झाला, लडाख, अरुणाचल प्रदेश यासाठी त्यांनी काय केले. शेतकऱ्यांना दिल्लीत येण्यापासून रोखले जात आहे. चीनच्या घुसखोरीबाबत ते काहीच बोलत नाही. त्यांनी विकासावर बोलण्याऐवजी मटन खाणे, मासळी खाणे यासारख्या विषयांवर ते बोलत आहे.

2014 मध्ये भाजपने युती तोडली होती.2019 मध्ये त्यांनी दिलेले शब्द पाळला नाही. त्यांनी जनतेला दिलेली आश्वासनेही पूर्ण झाले नाही. अनेक योजना फक्त कागदावरच आहेत. भाजप आता निवडणुकांना घाबरत आहे. त्यामुळे राज्यात अनेक महापालिकांच्या निवडणुका झालेल्या नाहीत.आमची ही लढाई सुरू आहे, ती संविधान रक्षणाची आणि लोकशाही रक्षणाची आहे. केंद्रात हुकूमशाही नको, ही आमची इच्छा आहे. केंद्रात संमिश्र आणि जनतेच्या समस्या सोडवणारे सरकार असायला हवे, अशी आमची अपेक्षा आहे. सत्यमेव जयते असे रामराज्य आणण्यासाठी आमची लढाई सुरू आहे, असेही आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

महाविकास आघाडीने मंदिराना दिलेला निधी, आताच्या सरकारने रोखून ठेवला आहे, हेच त्यांचे हिंदुत्व आहे काय, असा सवालही त्यांनी केला. हृदयात राम आणि हाताला काम हे आमचे हिंदुत्व आहे. महाविकास आघाडीच्या काळात मुंबईचा विकास झाला, याच गोष्टीची भाजपला पोटदुखी झाली आहे. मुंबई महापालिकेचे आमच्या काळातील 25 वर्षांच्या काळाचे ऑडीट करा आणि तुमच्या अडीच वर्षातील काळातील ऑडीट करा, सर्व परिस्थिती जनतेसमोर होईल. गोखले पूलावर भाजपच्या स्थानिक नेत्यांनी फोटोसेशन केले. मात्र, पुलाचे काम रखडले आहे, असेही आदित्य ठाकरे यांनी सांगितले.