अखेर पाकडे नरमले! युद्ध हा पर्याय नाही, हिंदुस्थानशी चर्चेला तयार

हिंदुस्थान आणि पाकिस्तानमधील संघर्ष अनेक वर्षांपासून सुरू आहे. पाकव्यप्त कश्मीरचा मुद्दा दोन्ही देशात वादाचा ठरला आहे. हिंदुस्थानने कश्मीरमधून कलम 370 रद्द केल्यानंतर दोन्ही देशांतील संघर्ष अधिक वाढला आहे. तसेच आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरही पाकिस्तानने अनेकदा कश्मीर राग आवळला आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय समुदायाने त्याची फारशी दखल घेतली नसल्याने पाकडे चांगलेच तोंडावर आपटले आहेत. त्यातच आता पाकिस्तान आर्थिक संकटात सापडल्याने त्यांनी आता नरमाईची भूमिका घेतली आहे.

सर्व बाजूंनी कोंडीत अडकलेल्या पाकिस्तानने हिंदुस्थानसमोर चर्चेचा पर्याय ठेवला आहे. युद्ध हा पर्याय होऊ शकत नाही. त्यामुळे आम्ही हिंदुस्थानशी चर्चेला तयार आहोत, असे पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी म्हटले आहे. दोन्ही देशातील संघर्ष कमी करण्यासाठी आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी हिंदुस्थान गांभीर्याने प्रयत्न करणार असेल तर आम्ही हिंदुस्थानशी चर्चेला तयार आहोत, असे शरीफ यांनी म्हटले आहे.

गेल्या 75 वर्षात हिंदुस्थानसोबत तीन युद्ध झाली आहेत. या युद्धांमुळे कोणताही तोडगा निघाला नसल्याने यातून फक्त गरीबी, बेरोजगारी आणि संसाधनाची कमतरता असे प्रश्न उभे ठाकले आहेत. त्यामुळे युद्ध हा पर्याय होऊ शकत नाही. त्यामुळे आता आम्ही हिंदुस्थानसमोर चर्चेचा पर्याय ठेवत असल्याचे शरीफ यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी अण्वस्त्रांच्या मुद्द्याचाही उल्लेख केला. पाकिस्तान अण्वस्त्रसज्ज देश आहे. मात्र, आक्रमण करण्यासाठी नव्हे, तर स्वसंरक्षणासाठी आम्ही सज्ज असल्याचे ते म्हणाले. अण्वस्त्र युद्धाची परिस्थिती कधीही येऊ नये, हीच आपली इच्छा आहे. त्यातून होणाऱ्या विनाशातून सारवण्यास अनेक वर्षे जातील. त्यामुळे कोणतीही समस्या सोडवण्यासाठी युद्ध हा पर्याय कधीच ठरू शकत नाही, असेही शरीफ यांनी स्पष्ट केले. पाकिस्तानचा हा पर्याय हा उशीराचे शहाणपण असेच म्हणावे लागेल.