नाराज कार्यकर्ते धक्का देण्याच्या तयारीत; कपिल पाटील यांचा शहापुरातील प्रचार थंडावला

भिवंडी लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार कपिल पाटील यांचा शहापूर तालुक्यातील प्रचार थंडावला आहे. गेली आठ वर्षे शहापूर तालुक्याचे अध्यक्ष असलेले भाजपचे भास्कर जाधव यांच्या मनमानीला कार्यकर्ते वैतागले असून त्यांनी प्रचारात भाग न घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कपिल पाटील यांच्या प्रचारात अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. पाटील यांनी शहापुरातील भाजपच्या कार्यकर्त्यांना कधीही विश्वासात घेतले नाही. अशीच भावना त्यांच्यात निर्माण झाल्याने लोकसभा निवडणुकीत अनेक जण आपला हिशेब चुकता करण्याच्या तयारी आहेत.

भिवंडी लोकसभा मतदारसंघात शहापूर तालुक्याला विशेष महत्त्व आहे. केंद्रीय मंत्री असताना कपिल पाटील यांनी कधीही शहापुरातील भाजप कार्यकर्त्यांची विचारपूस केली नाही किंवा त्यांना मदतीचा हात दिला नाही. एवढेच नव्हे तर पाटील यांनी स्वतःच्या मर्जीतील पदाधिकारी नेमले. किन्हवली परिसरात जनाधार असलेले सुभाष हरड यांना एकाच वर्षात अपमानास्पदरीत्या अध्यक्ष पदावरून पायउतार करून कपिल पाटील यांनी आपल्या मर्जीतील समाजकारण व राजकारणात नवख्या असलेल्या भास्कर जाधव यांची नियुक्ती केली. परंतु आपल्या पदाला योग्य न्याय न देता एककल्ली कारभार करून त्यांनी गटबाजीला खतपाणी घातले.

टक्केवारीचा आरोप
पद स्वीकारल्यापासून जाधव यांनी तहसील कार्यालयात ठाण मांडून उलटे सुलटे अर्थपूर्ण हेराफेरीचे उद्योग सुरू केले. यात भांडवलदारांची बाजू घेऊन मालमत्ता प्रकरणात अनेक गरीब शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे. तसेच खातिवलीच्या टाटा गृहप्रकल्पात टक्केवारी घेतल्याचा आरोप त्यांच्यावर होत आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये भास्कर जाधव यांच्याविरुद्ध प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे.

गटबाजी व मानापमान नाट्य
संघ परिवारातून आलेले अशोक इरनक यांचा वेळोवेळी पक्षात अपमान करून त्यांच्या राजकीय कार्यकिर्दीला लगाम घातला आहे. त्यामुळे कपिल पाटील यांच्या विरोधात इरनक यांना मानणारा वेगळा गट तालुक्यात तयार झाला. जाधव यांना प्रचारापासून दूर ठेवण्याच्या हालचाली सुरू आहेत. ऐन निवडणुकीच्या काळात भाजप कार्यकर्त्यांमध्ये गटबाजी तसेच मानापमान नाट्य रंगत असल्यामुळे त्याचा फटका भाजपचे कपिल पाटील यांना बसण्याची दाट शक्यता आहे.