कश्मिरी पंडितांची घरवापसी होईल, याची गॅरंटी पंतप्रधान मोदी यांनी घ्यावी; उद्धव ठाकरे यांचे आवाहन

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सोमवारी विधीमंडळाच्या अधिवेशनासाठी उपस्थित राहणार आहेत. त्यासाठी नागपूर विमानतळावर पोहचल्यावर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी कलम 370 बाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे स्वागत केले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महत्त्वाचे आवाहनही केले.

जम्मू कश्मीरमध्ये खुल्या वातावरणात निवडणुका घेण्यापूर्वी पाकव्याप्त कश्मीर (POK) घेऊन दाखवा. त्यामुळे संपूर्ण कश्मीरमध्ये निवडणुका घेण्यात येतील. कश्मीर हा हिंदुस्थानचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे POK घेतल्यावर संपूर्ण कश्मीरमध्ये खुल्या वातावरणात निवडणुका घेणे शक्य होईल. 2019 मध्ये कलम 370 हटवण्याच्या निर्णयाला आम्ही पाठिंबा दिला होता. आजदेखील सर्वोच्च न्यायालयाने ही निर्णय कायम ठेवला आहे. त्याचेही आम्ही स्वागत करत आहोत, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय घेतानाच येत्या सप्टेंबरपर्यंत तेथे निवडणुका घेण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत. मात्र, कश्मीरमध्ये निवडणुका घेण्यापूर्वी पाकव्याप कश्मीर (POK) हिंदुस्थानात घेण्यात यावा, म्हणजे संपूर्ण कश्मीरमध्ये निवडणुका घेणे शक्य होणार आहे. त्यामुळे देशवासियांना आनंद होईल, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. कश्मीरी पंडितांना कश्मीर सोडून पलायन करावे लागले. मात्र, आता कश्मीरी पंडित कश्मीरमध्ये परतले तर त्यांच्या सुरक्षेची हमी कोण देणार, हा महत्त्वाचा पश्न आहे, असेही ते म्हणाले. आगामी निवडणुकीपूर्वी कश्मीरी पंडित कश्मीरमध्ये परततील, याची हमी कोण घेणार, असा सवालही त्यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी याबाबतची हमी घेणार का असा सवाल त्यांनी केला.

सध्या गॅरंटी म्हणजेच हमी देण्याचा जमाना आहे, याची गॅरंटी, त्याची गॅरंटी देतात. पंतप्रधान मोदीही अनेक गोष्टींची गॅरंटी घेत आहेत. याची गॅरंटी देणार, त्याची गॅरंटी देणार. आता पंतप्रधान मोदी या विस्थापित झालेल्या कश्मीर पंडितांच्या घरवापसीची गॅरंटी घेणार का, असा सवालही त्यांनी केला. कश्मीरी पंडितांना कश्मीर सोडण्यास भाग पाडण्यात आले, त्यावेळी हिंदुहृयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी विस्थापित कश्मीरी पंडितांना महाराष्ट्रात आश्रय दिला होता. आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सप्टेंबरपूर्वी कश्मीरमध्ये निवडणुका घेण्यात येणार आहेत. त्या निवडणुकीपूर्वी कश्मीरी पंडित मतदानासाठी कश्मीरमध्ये परतणार, याची गॅरंटी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घ्यावी, अशी आपली अपेक्षा आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.