झोपड्यांमध्ये गरीब राहतात म्हणून त्यांना मुंबईबाहेर काढणार का? रॅली काढून पीयूष गोयल यांचा केला निषेध

केंद्र आणि राज्यातील भाजपधार्जिण्या मिंधे सरकारला मुंबईतील झोपडय़ांतून राहणारे गरीब आता मुंबईत राहायला नको आहेत, मात्र त्यांच्या जमिनी सरकारला हव्या आहेत. म्हणून पीयूष गोयलसारखे मंत्री झोपडीधारकांचे पुनर्वसन एसआरएच्या माध्यमातून मुंबईबाहेर मिठागरांच्या जमिनीवर करायचे म्हणत आहेत. पण आम्ही मुंबई सोडणार नाही, असे म्हणत शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आज मुंबईत ठिकठिकाणी काढलेल्या रॅलीत आणि आंदोलनात शेकडो झोपडीधारकांनी भाग घेत पेंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांचा निषेध केला.

मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प (एसआरए) या पुढे मुंबईत न उभारता ते मिठागरांच्या जागांवर उभारावेत आणि मुंबई झोपडपट्टीमुक्त करावी, असे वादग्रस्त विधान पेंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी एका मुलाखतीत केले. या विधानाविरोधात शिवसेना नेते-आमदार अॅड. अनिल परब यांच्या मार्गदर्शनाखाली विलेपार्ले विधानसभेच्या वतीने पीयूष गोयल यांचा निषेध करण्यात आला. शिवसेनेचे विलेपार्ले विधानसभेचे समन्वयक नितीन डिचोलकर यांच्या नेतृत्वाखाली काढलेल्या निषेध रॅलीत शेकडो रहिवासी सहभागी झाले होते. शिवसेना दक्षिण मुंबई भाग क्रमांक 12 च्या वतीने भाजप आणि पीयूष गोयल यांचा निषेध करण्यासाठी आज कुलाबा येथील आझादनगर, सुंदरनगर, मोरया गणपतीनगर झोपडपट्टी या ठिकाणी निषेध आंदोलन करण्यात आले. विभागप्रमुख संतोष शिंदे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या आंदोलनात दक्षिण मुंबईच्या महिला विभाग संघटिका युगंधरा साळेकर, माजी नगरसेविका सुजाता सानप, अरुंधती दुधवडकर, विधानसभा संघटक गणेश सानप, उपविभागप्रमुख कृष्णा पवळे, बाजीराव मालुसरे आणि शिवसेना-युवासेना महिला आघाडीचे सर्व पदाधिकारी आणि झोपडय़ांमधील रहिवासी सहभागी झाले होते.