सावेडी हत्याकांड प्रकरणी काँग्रेसकडून सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने

प्राणघातक हल्ल्यात मृत्यूशी झुंज देणाऱ्या राष्ट्रवादीच्या अंकुश चत्तर यांच्या मृत्यूनंतर काँग्रेसने आक्रमक होत रस्त्यावर उतरून सरकारचा निषेध केला. चितळे रोडवर कार्यकर्त्यांनी सरकार, गृहमंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी करत जोरदार निदर्शने केली. हृदयद्रावक सावेडी हत्याकांड प्रकरणी तीव्र संताप व्यक्त केला. खूनाचा मूळ सूत्रधार भाजपाचा नगरसेवक आहे. राज्यात भाजपप्रणित सरकार आहे. गृहमंत्री भाजपचे आहेत. तेच नगरचे प्रभारी आहेत. सावेडीसह शहरातील हिंदुत्ववादी चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा बळी भाजप, राष्ट्रवादीचे गुंड कार्यकर्ते घेत असल्याचा तीव्र संताप यावेळी शहर जिल्हाध्यक्ष किरण काळेंनी व्यक्त केला.

काळे म्हणाले की, शहराला राजकीय गुन्हेगारीचा कलंक लागला आहे. शिवसैनिकांच्या केडगाव दुहेरी हत्याकांडानंतर चत्तर, ओंकार भागानगरे या हिंदुत्ववादी चळवळीत काम करणाऱ्या तरुणांचे बळी घेतले गेले. हल्ले करणारे, बळी पडणारे अशा दोन्ही गटांची पार्श्वभूमी गुन्हेगारीची आहे. जमिनींवर बेकायदेशीर ताबे करणे, अवैध धंदे, वर्चस्ववादाच्या घाणेरड्या स्पर्धेतून शहराला वेठीस धरले जात आहे. ताज्या दोन्ही घटनांमध्ये या गुन्हेगारांना राजकीय वरदहस्त आहे. पोलीस प्रशासन आणि तथाकथित राज्यातील हिंदुत्ववादी सरकार मात्र केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप काळेंनी यावेळी केला.

शहर लोकप्रतिनिधी एसपींना निवेदन देत कायदा – सुव्यवस्था ढासळल्याच्या आरोप करत आहेत. ही त्यांची नौटंकी सुरू असून भाजपचा आरोपी नगरसेवक, भागानगरे हत्याकांडातील आरोपी, हे सगळे राष्ट्रवादीचेच कार्यकर्ते आहेत. राजकारण्यांनी शहरात पेरलेल्या गुन्हेगारीच्या बीजाचा आता महावटवृक्ष झाला आहे. यामुळे शहर बरबाद झाले आहे, विकास खुंटला आहे. शहरातील अवैध धंदे, गुन्हेगारी कृत्यांना आळा घायलाचा असेल तर त्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाने आधी एसपी ऑफिस हल्ला प्रकरणातील सगळ्या आरोपींना तात्काळ तडीपार करावे, अशी मागणी काळेंनी एसपी राकेश ओलांकडे केली आहे

आरोपींची हकालपट्टी करा
सामान्य नगरकरांच्या संयमाची परीक्षा न पाहता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, शहर भाजपने त्या नगरसेवकाची पक्षातून तात्काळ हकालपट्टी करावी, त्याचे नगरसेवक पद रद्द करावे अशी मागणी काँग्रेसने केली आहे. काळे म्हणाले, हत्याकांडामुळे सावेडी उपनगराला कलंक लागला आहे. काही राजकीय पक्ष, मोठे नेते गुन्हेगारांना पोसत आहेत. ते कोण आहेत हे नगरकरांना माहित आहे. अंतर्गत टोळी युद्धातून दहशत केली जात आहेत.

नितेश राणेंवर काँग्रेसचा घणाघात
नगरमधील वातावरण दूषित करण्याचे काम भाजप नेते आमदार नितेश राणे वेळोवेळी करतात. यापूर्वी देखील त्यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित करत शहरात जातीय दंगल भडकेल अशा पद्धतीने गरळ ओकली आहे. आता त्यांच्याच नगरसेवकाने हत्याकांड केले आहे. हिम्मत असेल तर राणेंनी त्यांच्या गृहमंत्र्यांना अधिवेशनात जाब विचारून दाखवावा, असे जाहीर आव्हान काळेंनी राणेंना दिले आहे.

यावेळी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा, मनपा माजी विरोधी पक्ष नेते दशरथ शिंदे, ओबीसी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष संजय झिंजे, अल्पसंख्यांक काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष अनिस चुडीवाला, महिला काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष उषाताई भगत, काँग्रेस मागासवर्गीय विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष नाथा अल्हाट, युवक काँग्रेसचे गंगाधर जवंजाळ, केडगाव विभाग प्रमुख विलास उबाळे, सांस्कृतिक काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. बापू चंदनशिवे, उपाध्यक्ष निजाम जहागीरदार, सामाजिक न्याय युवा विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष प्रणव मकासरे, सचिव गणेश आपरे, अपंग विभाग शहर जिल्हाध्यक्ष सोफियान रंगरेज, तुषार मांडोळे, जयराम आखाडे, राजेंद्र तरडे, बाबासाहेब वैरागर, विजय शिंदे आदींसह काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.