अल्पवयीन आरोपीच्या आजोबाने चालकाला दोन दिवस डांबून ठेवले, सुरेंद्र अगरवालला अटक

कल्याणीनगर ‘हिट अॅण्ड रन’ प्रकरणात रोज नवनवीन धक्कादायक माहिती समोर येत आहे. अपघातावेळी बिल्डर विशाल अगरवालचा अपल्पवयीन मुलगाच पेर्शे कार चालवत होता हे स्पष्ट झाले आहे. मात्र, आपल्या नातवाला वाचवण्यासाठी आजोबा सुरेंद्र अगरवाल आणि वडील विशाल या दोघांनी त्यांच्याकडे कामगार असलेल्या कारचालकावर दबाव टाकला. नातवाने केलेला गुन्हा तुझ्या अंगावर घे म्हणत कारचालकाला धमकावत दोन दिवस डांबून ठेवले. आज गुन्हे शाखेच्या पोलिसांनी वडगाव शेरीतील बंगल्यावर छापा टाकला आणि सुरेंद्र अगरवालला (74) अटक केली आहे. दरम्यान, आरोपी अल्पवयीन मुलगा बाल सुधारगृहात, बाप येरवडा कारागृहात आणि आजोबा पोलीस कोठडीत आहे.

याबाबत अगरवाल यांचा कारचालक गंगाधर शिवराज हेरीक्रुब यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
कल्याणीनगर भागात रविवारी (दि. 19) मध्यरात्री मद्यधुंद अल्पवयीन मुलाने भरधाव कार चालवत दोघांना चिरडले. यात दुचाकीवरील संगणक अभियंता तरुण आणि तरुणीचा मृत्यू झाला होता. यावेळी विशाल अगरवालचा मुलगा कार चालवित होता. त्यावेळी कारचालक गंगाधरदेखील कारमध्ये बाजूच्या सीटवर बसलेला होता. मात्र, अपघातानंतर मुलाचे वडील विशाल आणि आजोबा सुरेंद्र यांनी कारचालक गंगाधर याला दोन दिवस वडगाव शेरीतील बंगल्यात डांबून ठेवले. गंगाधर घरी न आल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी शोध घेतला. अगरवाल यांच्या घरी गेले. तेव्हा अगरवाल यांनी गंगाधरला सोडले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

अपघातानंतर अगरवाल यांच्याकडे काम करणारा कारचालक मानसिक तणावात होता. पोलिसांनी त्याचा जबाब नोंदवून आरोपी सुरेंद्र अगरवाल आणि त्यांचा मुलगा विशाल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कारचालकाने अपघाताचा आरोप स्वतःवर घ्यावा. त्याबदल्यात चांगले बक्षीस देऊ, तुझी काही मागणी असेल तर ती पूर्ण करू, असे आमिष अगरवाल यांनी दाखविले होते. आम्ही सांगितल्याप्रमाणे तू वागला नाही, तर तुला बघून घेऊ, अशी धमकी अगरवाल यांनी कारचालकाला दिली होती.

28 तारखेपर्यंत पोलीस कोठडी

सुरेंद्र अगरवाल याला शनिवारी (दि.25) सुट्टीच्या न्यायालयात हजर करण्यात आले. गुह्याच्या तपासादरम्यान घटनास्थळावरून फिर्यादीचे वापरलेले कपडे आरोपीच्या राहत्या घरातून हस्तगत करण्यात आलेले आहेत. आरोपीचा या गुह्यात प्रत्यक्ष सहभाग निष्पन्न झाला असून, त्या अनुषंगाने सविस्तर तपास करण्यासाठी सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात यावी, असा युक्तिवाद अॅड. बी. एच. डांगळे यांनी केला.

…तपास योग्य दिशेने – आयुक्त

अपघात घडला त्यावेळी कारमध्ये अगरवाल यांचा मुलगा, त्याचे दोन मित्र आणि कारचालक गंगाधर होता. गंगाधरने कार मी चालवित नसल्याचे सांगितले आहे. कारमध्ये आणखी कोण होते का? यासह इतर बाबींचा तपास योग्य पद्धतीने सुरू असल्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.

…रॅप साँग व्हायरल करणाऱयावर गुन्हा

अपघाताच्या घटनेबद्दल राज्यासह देशभर संतापाची लाट पसरली होती. त्यातच सोशल मीडियावर एक रॅप साँग व्हायरल झाले होते. या गाण्यातील मुलगा आपल्या कृत्याचे समर्थनार्थ गाणं गात असल्याचे दिसतो. त्यामुळे या घटनेबद्दल आणखीच चीड निर्माण झाली होती. या रॅपरचा शोध लागला असून, हे रॅप साँग गाणाऱया आर्यन देव निखरा (रा. ग्वॉलिअर, मध्य प्रदेश) या तरुणाविरोधात सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

अगरवाल यांच्या बंगल्यावर गुन्हे शाखेचा छापा

वडगाव शेरीतील अगरवाल यांच्या बंगल्यावर पोलिसांनी छापा टाकून घटनास्थळाचा पंचनामा केला. कारचालक गंगाधर याला कोणत्या खोलीत डांबून ठेवले होते, गंगाधरने वापरलेला गणवेश बंगल्यात ठेवण्यात आला आहे का? तसेच गंगाधरला कोणत्या वाहनातून बंगल्यात आणले, यादृष्टीने तपास करण्यात येत आहे.