पुण्यात रात्रीच्या वेळी नागरिकांना अडवून लुटणारी टोळी गजाआड

रात्रीच्या वेळी पादचारी नागरिकांना शस्त्राचा धाक दाखवून लुटणार्‍या टोळीला गुन्हे शाखा यूनिट चारच्या पथकाने अटक केली. चोरट्यांकडून 20 मोबाइल, चाकू, दुचाकी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून शहरातील सिंहगड, खडकी, चतुःश्रुंगी, भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील 12 गुन्हे उघडकीस आले आहेत.

किशोर उत्तम गायकवाड (वय 19), अजय उर्फ ओंकार सुरेश गाडेकर (वय 21), आशिष उर्फ बोना संतोष सोजवळ (वय 24), जॉर्ज डॉमनिक डिसोझा (वय 19, चौघे रा. बोपोडी), साहिल सलीम शेख (वय 19, रा. इंदिरानगर, खडकी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. यातील गायकवाड हा मुख्य सुत्रधार असून त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत.

आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखा यूनिट चारचे पथक हद्दीत गस्तीवर होते. या दरम्यान जुन्या मुंबई-पुणे रस्त्यावर बोपोडी मेट्रो स्थानक परिसरात आरोपी गायकवाड, गाडेकर, सोजवळ नागरिकांना स्वस्तात मोबाइल विक्री करत असल्याची माहिती यूनिट चारचे पोलीस अंमलदार अजय गायकवाड आणि सारस साळवी यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने सापळा लावून तिघांना पकडले.

त्याच्याकडून दुचाकी, 12 मोबाइल , चाकू असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चौकशीत आरोपी गायकवाड, गाडेकर, सोजवळ यांनी साथीदारांसह पुणे, पिंपरी चिंचवड भागात गुन्हे केल्याचे समोर आले. त्त्यानूसार पोलिसांनी डिसोझा आणि शेख यांनाही ताब्यात घेतले. आरोपींनी रात्रीच्या वेळी पादचार्‍यांना चाकूचा धाक दाखवून मोबाइल हिसकावल्याची कबुली दिली. त्यानूसार पोलिसांनी त्यांना अटक केली.

गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली यूनिट चारचे पोलीस निरीक्षक गणेश माने, सहायक निरीक्षक विकास जाधव, उपनिरीक्षक महेंद्र पवार, जयदीप पाटील, अंमलदार हरीष मोरे, प्रवीण भालचिम, विठ्ठल वाव्हळ यांच्यासह पथकाने ही कामगिरी केली.

आरोपी हे रात्रीच्या वेळी महामार्गावर नागरिकांना अडवून जबरदस्तीने मोबाईल हिसकावून लुटमार करत होते. परिसरात गस्त घालत असताना आरोपींची माहिती मिळाली. त्यानूसार कारवाई करून वीस मोबाईल जप्त केले आहेत.
– गणेश माने, पोलीस निरीक्षक, युनिट चार.