शेतकरी म्हणतात, खासगीकरणाचा फायदा फक्त श्रीमंतांनाच, राहुल गांधी आणि शेतकऱयांमधील संवाद व्हायरल 

केंद्र खासगीकरणाची कास धरत आहे. या खासगीकरणाचा फायदा नेमका कुणाला होईल, असा प्रश्न विचारताच शेतकऱयांनी याचा फायदा फक्त देशातील बडय़ा लोकांना, श्रीमंतांनाच होईल असे उत्तर दिले. तसेच पूर्वी शेती करणे सोपे होते; कारण पिकविम्याचे पैसे लगेच मिळायचे. पण आता विम्याचे पैसे वेळेवर मिळत नाहीत. हे सरकार कामाचे नाही, असेही शेतकरी म्हणाले. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी हरयाणाच्या सोनीपत येथे शेतात ट्रक्टर चालवला. तसेच संजय मलिक आणि तस्बीर कुमार या शेतकऱयांशी संवादही साधला. या संवादाचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे.

 

राहुल गांधी यांनी सोनीपतहून आलेल्या महिलांसोबत सोनिया आणि प्रियंका गांधी यांचा हरयाणवी गाण्यावर केलेल्या डान्सचा व्हिडीओही शेयर केला. व्हिडीओच्या सुरुवातीला सोनीपतच्या दोन शेतकऱयांसोबतचा संवाद आहे. 8 जुलै रोजी शिमल्याला जाताना सोनीपतच्या मदीना गावात राहुल यांनी या शेतकऱयांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान राहुल यांनी शेतात ट्रक्चर चालविला, भातलावणी केली, शेतकऱयांसोबत भोजन केले. त्यावेळी त्यांनी येथील महिलांना दिल्लीत येण्याचे निमंत्रणही दिले होते.

 

माझे घर सरकारने काढून घेतले

राहुल यांनी महिलांची तसेच त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचीही चौकशी केली. यावेळी महिलांनी राहुल यांना दिल्लीबद्दल आणि त्यांच्या घराबद्दल विचारले. तेव्हा सरकारने माझे घर काढून घेतले; पण तुम्ही दिल्लीला या. तुम्हाला दिल्ली दाखवतो असेही राहुल म्हणाले. त्यानंतर राहुल यांनी प्रियंका यांची महिलांशी गाठ घालून दिली. शुक्रवारी राहुल यांनी विशेष गाडी पाठवून या महिलांना दिल्लीला आणले. तसेच त्यांना इंडिया गेट दाखवले. त्यानंतर प्रियंका व सोनिया गांधी यांनीही या महिलांची भेट घेतली.