महायुतीला नाशिकमध्ये अजून उमेदवार सापडत नाही! राजाभाऊ वाजेंच्या प्रचार रॅलीत जयंत पाटील यांची टीका

महाविकास आघाडीचे नाशिक मतदारसंघाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. महाविकास आघाडीचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात तसंच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत वाजे यांनी अर्ज सादर केला. यावेळी बोलताना जयंत पाटील यांनी नाशिकमध्ये अद्याप महायुतीने उमेदवार न दिल्यावरून भाजपवर टीका केली.

सोमवारी महाविकास आघाडीकडून शालिमार येथील शिवसेना कार्यालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. या वेळी भाजपवर जोरदार निशाणा साधताना जयंत पाटील म्हणाले की, सगळा उत्तर महाराष्ट्र संपूर्ण ताकदीने महाविकास आघाडीच्या मागे उभा आहे. उरलेल्या निवडणुका झाल्या की कळेल की भाजपची एकही जागा निवडून येणार नाही. जर चुकून आलेच तर गडकरी साहेबांची परिस्थिती आहे, बाकी एकही उमेदवार निवडून येण्याच्या पात्रतेचा नाही. सगळा महाराष्ट्र भाजपविरोधी आहे. गुजरातचा कांदा निर्यात झाला. भाजपला महाराष्ट्राचा कांदा दिसला नाही. माझं नाशिककरांना आवाहन आहे की, त्यांनी मशाल आणि हातात तुतारी घेतलेला माणूस यांना हातात हात घालून दिल्लीला पाठवावं. भाजपच्या पराभव करण्यासाठी मतदारांनी बाहेर पडून मतदान करावं, असं आवाहन पाटील यांनी केलं.

महायुतीने अद्याप नाशिकमध्ये उमेदवार दिलेला नाही. त्यावरून जयंत पाटील यांनी भाजपवर टीका केली, ते म्हणाले की, नाशिकमध्ये राजाभाऊ यांचा प्रभाव एवढा आहे की, समोर उमेदवार सापडत नाही. मला आधी वाटायचं की राजाभाऊंसारखा साधा माणूस आमच्या पक्षात आहे. पण त्यांना विरोधक किती घाबरलेले आहेत. कुणाला तिकीट द्यावं कुणाला नाही, याचा निर्णय अजून होत नाही, अशी टीकाही जयंत पाटील यांनी यावेळी केली.