मध्य प्रदेशात ‘कमलनाथ’, राजस्थान छत्तीसगडमध्ये चुरशीची लढत; सर्व्हेतील निष्कर्ष

देशात 2024 मध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्याआधी पाच राज्यांच्या विधानसभानिवडणुका होत आहेत. या निवडणुकांकडे लोकसभेच्या निवडणुकांची रंगीत तालिम म्हणून बघितले जात आहे. छत्तीसगड, राजस्थान, मध्य प्रदेश, तेलंगणा आणि मिझोरम या राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुकांमुळे राजकीय वातावरण तापले आहे. या निवडणुकांच्या निकालांमधून लोकसभा निवडणुकांचा कल लक्षात येणार आहे. छत्तीसगड, राजस्थान, मध्य प्रदेश, मिझोरम आणि तेलंगणाच्या विधानसभा निवडणुकीत कुणाचे सरकार येणार, कुणाचा पराभव होणार, याबाबतचा सर्व्हे उघड झाला आहे.‘एबीपी न्यूज सी-वोटर’ने सर्व्हेच्या माध्यमातून 63 हजार जणांचे मत जाणून घेत हा सर्वे केला आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये काँग्रेस आघाडीवर आहे. तर, राजस्थानमध्ये चुरशीची लढत होण्याची शक्यता सर्व्हेमधून दिसून येत आहे. तेलंगण आणि मिझोरममध्ये प्रादेशिक पक्षाचेच सरकार येण्याची शक्यता वर्तवली आहे.

छत्तीसगडमध्ये विधानसभेच्या 90 जागांवर सत्ताधारी काँग्रेस आणि भाजपत थेट लढत होणार आहे. सर्व्हेनुसार काँग्रेसला 45 टक्के तर भाजपला 43 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे छत्तीसगडमध्ये पुन्हा एकदा काँग्रसचे सरकार येऊ शकते. काँग्रेसला बहुमतासह 45 ते 51 जागांवर आघाडी मिळण्याची शक्यता आहे. तर, भाजपला 36 ते 42 जागा मिळू शकतात.

सर्व्हेनुसार राजस्थानमध्ये काँग्रेस आणि भाजपमध्ये चुरशीची लढत होणार आहे. 200 जागा असलेल्या राजस्थानमध्ये भाजपाला 42 टक्के तर काँग्रेसला ४5 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे राजस्थानमध्ये जनता सत्तापरिवर्तन करणार की काँग्रेसला साथ देणार हे निवडणुकांनंतरच स्पष्ट होणार आहे. मध्य प्रदेशात सत्ताधारी भाजप आणि काँग्रेसमध्ये अटीतटीची लढाई होणार आहे. 230 जागा असलेल्या मध्य प्रदेशात काँग्रेसला 45 टक्के, तर भाजपाला 42 टक्के मतदान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काँग्रेसचे 118 ते 130 उमेदवार निवडून येऊ शकतात. त्याचप्रमाणे भाजपला 99 ते 111 जागांवर विजय मिळू शकतो.

तेलंगणात 119 जागांवर भारत राष्ट्र समिती ( बीआरएस ) आणि काँग्रेसमध्ये लढत होणार आहे. सर्व्हेनुसार बीआरएसला 41 टक्के तर काँग्रेसला 39 टक्के मते मिळू शकतात. तर, बीआरएसला 49 ते 61 आणि काँग्रेसला 43 ते 55 जागा मिळण्याची शक्यता आहे. मिझोरममध्ये 40 जागांसाठी निवडणूक होणार आहे. यामध्ये मिझोरम नॅशनल फ्रंटला 17 ते 21, काँग्रेसला 6 ते 10 आणि झेडपीएम आघाडीचा 10 ते 14 जागांवर विजय होऊ शकतो.