भाजपतर्फे अशोक चव्हाणांना राज्यसभेची उमेदवारी, काँग्रेसतर्फे चंद्रकांत हंडोरेंना संधी

राज्य सभेच्या सहा जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी भाजपने आपल्या 3 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. यामध्ये काँग्रेस सोडून भाजपमध्ये आलेल्या अशोक चव्हाणांचा समावेश आहे. सातत्याने संधी डावलण्यात आल्याने नाराज असलेल्या मेधा कुलकर्णी यांनाही राज्यसभेवर पाठवण्याचा भाजपने निर्णय घेतला आहे. याव्यतिरिक्त अजित गोपछडे यांनाही भाजपने उमेदवारी देऊ केली आहे. काँग्रेसने महाराष्ट्रातून चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसने 4 राज्यातून 4 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. राजस्थानातून सोनिया गांधी, बिहारमधून डॉ.अखिलेश प्रसाद सिंह, हिमाचल प्रदेशमधून अभिषेक मनु सिंघवी आणि महाराष्ट्रातून हंडोरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

राज्यसभेची निवडणूक जाहीर झाली असून 56 जागांसाठी येत्या 27 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. या 56 जागांपैकी 6 जागा महाराष्ट्रातील आहेत.

राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपने माजी केंद्रीय मंत्री आर.पी.एन. सिंग आणि सुधांशू त्रिवेदी यांच्यासह 14 उमेदवारांची नावे 11 फेब्रुवारी रोजी जाहीर केली होती. त्रिवेदी यांचा एकमेव अपवाद वगळता बाकी सर्व नवीन चेहरे आहेत. कर्नाटकातील नारायणसा के भंडगे, छत्तीसगढचे गोंड राजघराण्यातील देवेंद्र प्रताप सिंह, बिहारसाठी धर्मशिला गुप्ता आणि भीम सिंह हे भाजपचे उमेदवार आहेत. हरियाणासाठी भाजपचे माजी अध्यक्ष सुभाष बराला, तर समिक भट्टाचार्य पश्चिम बंगालमधून उमेदवार असतील. या नावांमध्ये एकाही केंद्रीय मंत्र्याचे नाव नव्हते.

तृणमूल काँग्रेसने राज्यसभा निवडणूकीसाठी त्यांच्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यात पत्रकार सागरिका घोष, सुष्मिता देव, ममता बाला ठाकूर व नदीमुल हक यांना उमेदवारी देण्यात आली आहे.