रोखठोक – हे धर्मयुद्ध नाही! इस्रायल-हमास युद्धात नियमांच्या चिंधड्या

युद्धाचे सर्व नियम तोडून इस्रायल आणि हमासमध्ये युद्ध सुरू आहे. नागरी वस्त्या, इस्पितळे, शाळांवर हल्ले करू नयेत हा युद्धाचा जागतिक नियम आहे. इस्पितळावर हल्ला करून 500 पालेस्टिनी लोकांना ठार केले गेले. ते क्रौर्य अनुभवण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे तेल अवीवला उतरले. ‘युनो’, ‘जिनिव्हा’ करारास न जुमानता जगभरात विध्वंस सुरू आहे. ‘ला आाफ वार’ पूर्णपणे कोलमडले. सर्वच हुकूमशहांना युद्ध हवे आहे ते लोकप्रिय होण्यासाठी व निवडणुका जिंकण्यासाठी.

जगातील बहुतेक राज्यकर्त्यांच्या अंगात हुकूमशाहीचा संचार झाला आहे व आपली सत्ता टिकविण्यासाठी युद्ध आणि सदोष मनुष्यवधाचा मार्ग त्यांनी स्वीकारला आहे. इस्रायल विरुद्ध ‘हमास’ युद्धाने अमानुषतेची सर्व शिखरे पार केली. युद्धाचे सर्व नियम मोडून इस्रायलने मानवतेवर हल्ला केला व ते क्रौर्य अनुभवण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे स्वतः इस्रायलच्या भूमीवर उतरले. बायडेन हे राष्ट्राध्यक्ष होताच त्यांनी एक काम केले ते म्हणजे, अफगाणिस्तानातील अमेरिकन फौजांना माघारी बोलावले व एक प्रकारे तालिबान्यांविरोधात युद्धबंदी केली. अफगाणिस्तानचे युद्ध रशिया व अमेरिका जिंकू शकले नाहीत. त्यांचे हजारो सैनिक मारले गेले. तेच बायडेन युद्ध भडकल्यावर इस्रायलला पाठिंबा देतात व प्रत्यक्ष युद्धभूमीवर जाऊन उभे राहतात. रशिया-युक्रेन युद्धात युरोपियन राष्ट्रे युक्रेनच्या बाजूने उभी राहिली, पण युक्रेनची राखरांगोळी व मनुष्यहानी ती वाचवू शकली नाहीत. युद्ध सुरू असताना ब्रिटनचे पंतप्रधान युक्रेनच्या कीव शहरात गेले व आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन तेल अवीवला उतरले. बायडेन हे वयाने व शरीराने थकले आहेत. अनेकदा ते चालताना व सार्वजनिक कार्यक्रमात भोवळ येऊन पडतात. असे बायडेन अरबांचा विध्वंस पाहण्यासाठी तेल अवीवला आले. उद्या श्री. नरेंद्र मोदीही बायडेन यांचे अनुकरण करतील. त्याने काय होणार?

इस्पितळावर हल्ला

इस्रायलच्या सेनेने मंगळवारी ‘मिसाईल’ हल्ला करून गाझापट्टीतील एक इस्पितळ उद्ध्वस्त केले. त्यात 500 लोकांचा मृत्यू झाला. इस्पितळावर हल्ला हा युद्ध नियमांच्या आणि मानवतेच्या विरोधात आहे. हा युद्ध अपराध आहे. नरसंहार आहे. असे नरसंहार आज कोठे होत नाहीत? इराकवरील हल्ल्यात अमेरिकेने असाच नरसंहार केला व इराकचा नेता सद्दाम हुसेन याला फासावर लटकवले, पण अमेरिकेला जाब विचारणार कोण? सीरिया-युक्रेनमध्ये असाच नरसंहार झाला. आता त्यासाठी पालेस्टाईनची भूमी निवडली. इस्रायल आणि पालेस्टाईन यांच्यातला संघर्ष नवा नाही, पण ‘हमास’ ही दहशतवादी संघटना पालेस्टाईनचे प्रतिनिधित्व करीत नाही. हमासने इस्रायलवर केलेल्या हल्ल्याची भयंकर शिक्षा पालेस्टाईनचे नागरिक भोगत आहेत. हमासला खतम करणे व पालेस्टाईन जनतेला मारणे या दोन वेगळय़ा गोष्टी आहेत. अरब-इस्रायल संघर्ष फक्त 32 एकर जमिनीच्या तुकडय़ासाठी आहे. येथे ज्यू, मुसलमान व ख्रिश्चन अशा तिन्ही धर्मांची प्रार्थनास्थळे आहेत. इस्रायलच्या भूमीवर आज ज्यूंचे राज्य आहे व त्यांची आर्थिक ताकद मोठी आहे. ज्ञान, विज्ञानाचे कोठार त्यांच्याकडे आहे व जगाचे सावकार म्हणून ते वावरत आहेत. आपली भूमी इस्रायली लोकांनी व्यापली ही अरबांची भावना आणि ही भूमी सर्वप्रथम यहुदींची होती, ती अरबांनी नंतर व्यापली म्हणून त्यांची होत नाही अशी इस्रायलची भूमिका आहे. इस्रायलने अरबांकडून जेरुसलेम घेतले हे खरे. परंतु ते युद्ध करून घेतले आणि ते आधी त्यांचे होते म्हणून घेतले हे विसरता येणार नाही. यहुदी धर्माची स्थापना पाच हजार वर्षांपूर्वी झाली. त्यानंतर 1994 वर्षांपूर्वी येशू ख्रिस्ताने पाथालिक धर्माची स्थापना केली. नंतर महंमद पैगंबराने मुस्लिम धर्माची स्थापना केली. ही मालिका मान्य केली तर जेरुसलेमचे पहिले मालक ज्यू ठरतात, मग ख्रिश्चन आणि मुस्लिम. यहुदांवर रोमन आणि अरबांनी आक्रमणे केली. त्यांचे भव्य धर्म मंदिर दुसऱयांदा पाडले. चोहोबाजूंनी भिंत असलेले जेरुसलेम उद्ध्वस्त केले, तेव्हा ज्यू समाज जगभर गेला. त्यांनी दुसऱया महायुद्धानंतर आपली भूमी परत मिळवली आणि जगभरच्या ज्यूंना तेथे आणले. त्यानंतर झालेल्या संघर्षात अरबांचा पराभव करून गोलन टेकडय़ांपासून गाझापट्टीपर्यंत आजचे इस्रायल उभे केले. 1967 च्या अरब- इस्रायल युद्धातून हे घडले. आपल्या कोकणपट्टीइतके हे राष्ट्र एक प्रबळ राष्ट्र म्हणून उभे आहे व त्यांनी पुकारलेल्या युद्धास पाठिंबा देण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्रपती ‘तेल’ अवीवला येतात ते त्यांच्या आर्थिक स्वार्थासाठी.

अन्न-पाण्याशिवाय गाझा

झुरळे मारावीत त्याप्रमाणे गाझापट्टीत माणसे मारली जात आहेत. गाझाचे पाणी, वीज, अन्नपुरवठा इस्रायलने बंद केला आहे. ‘हमास’ला उखडणे म्हणजे असा नरसंहार घडवणे नव्हे. इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांच्या विरोधात त्यांचीच जनता रस्त्यावर उतरली आहे. नेतान्याहू यांच्या धोरणांमुळे आजचे युद्ध जनतेवर लादले. नेतान्याहू हे ‘युद्ध गुन्हेगार’ आहेत असे त्यांचेच लोक म्हणू लागले. महाभारताच्या युद्धातही नियम होते, पण तेथेही नियमांची अवज्ञा झाली. योद्धय़ांनी एकमेकांना समान परिस्थितीत सामोरे जावे. निःशस्त्र लोकांवर हल्ला करू नये. ज्यांनी मैदान सोडले त्यांना मारले जाऊ नये. जो आधीच घायाळ व हतबल झाला आहे त्याच्यावर पुन्हा शस्त्र चालवू नये. युद्ध सूर्योदयापूर्वी सुरू होऊ नये व सूर्यास्तापर्यंत संपवायला हवे. जयद्रथाच्या वधाच्या वेळी हा नियम तोडण्यात आला. आज इस्रायल-हमास युद्धात तेच होत आहे.

नियम कोठे गेले?

हमासने सूर्योदयापूर्वी इस्रायलवर 5000 क्षेपणास्त्रे डागली. इस्रायलच्या हद्दीत घुसून शेकडो लोकांना बंधक बनवले. त्यात वृद्ध, स्त्रिया व लहान मुले होती. आता त्यांना ठार केले आहे. युद्धात नागरिकांना मारले जाऊ नये. नागरी वस्त्यांवर, इस्पितळांवर हल्ले करू नयेत हा नियम आहे. नियम मोडणे हा ‘युद्ध अपराध’ आहे. इराक, युक्रेन व आता इस्रायल-हमास युद्धात हे अपराध घडत आहेत. शाळा, कालेज व घरांवर बाम्ब टाकू नयेत. वैद्यकीय सेवा देणारे लोक व पत्रकारांना मारू नये. या नियमांचे उल्लंघन आता झालेच आहे. युद्धाच्या वेळी ‘ला आाफ वार’ लागू होतो, पण आता प्रबळ देश ‘युनो’ आणि ‘जिनिव्हा’ करारास भीक घालत नाहीत. ज्याची दादागिरी त्याचे नियम. जो बायडेन त्यांचे सावकार, इस्रायलच्या भूमीवर उतरून निरपराध्यांच्या हत्या पाहतात, ही मानवता नाही. हमास ही अल कायदापेक्षा भयंकर आहे. त्यांचा बंदोबस्त जगाने एकत्र येऊन करावा. अमेरिकेने लादेनला संपवले तेव्हा पाकिस्तानवर बाम्बहल्ले केले नव्हते. जग झोपेत असताना अमेरिकेचे कमांडोज पाकिस्तानात घुसले व त्यांनी लादेनला मारले. त्याबद्दल जगाने अमेरिकेचे कौतुक केले. तीच अमेरिका इस्रायलच्या निर्घृण रक्तपाताचे समर्थन करीत आहे. पालेस्टाईनचे संस्थापक यासर अराफत आज हयात नाहीत. इस्रायल पालेस्टाईन लोकांवर कसा अन्याय करते हे सांगणाऱया अराफत यांना जगात प्रतिष्ठा होती. त्यांच्याशी चर्चा होऊ शकत होती. अराफतनंतर पालेस्टाईन लढय़ाचा चेहराच हरवला. हमास म्हणजे पालेस्टाईनचे नेतृत्व नव्हे, पण हमास संपविण्याच्या नावाखाली इस्रायल गाझा भूमीवरील सर्व अरबांना संपवत आहे.

युद्धाचे नियम मोडून एक युद्ध सुरू आहे. जग मूकदर्शक आहे!

धर्माच्या नावावर आणि धर्मासाठी हे युद्ध सुरू आहे, पण एकही ‘धर्म’ त्या भूमीवर नागरिकांचे रक्षण करू शकला नाही. जेरुसलेम इस्रायलच्या भूमीवर आहे. तीन धर्मांची पवित्र स्थळे या एकाच जेरुसलेमच्या भूमीवर आहेत. ज्यू, ख्रिश्चन आणि इस्लाम धर्माची ही पवित्र नगरी. तीन धर्मांचा त्रिवेणी संगमच जणू इथे झालाय. येथे आजही ज्यूंच्या पवित्र सोलोमन मंदिरांची भिंत उभी आहे. जेरुसलेम शहरातच येशू ख्रिस्ताला सुळावर चढवले गेले. ‘चर्च आाफ द होली सेपल्चर’मध्ये तो वधस्तंभ आहे. जेरुसलेममध्येच प्राचीन अल अक्सा मशीद आहे. याच मशिदीतून इस्लाम धर्माची उत्पत्ती झाली. याच स्थानावरून इस्लाम धर्माचे पैगंबर मोहम्मद यांनी स्वर्गाकडे प्रयाण केले. या मशिदीचा संदर्भ कुराण शरीफमध्ये आहे. तीन धर्मांची पवित्र स्थळे ज्या भूमीवर उभी आहेत तेथे निरपराध नागरिकांचे रोज बळी जात आहेत व त्यातील एकही धर्म आपल्या नागरिकांचे प्राण वाचवू शकला नाही. सर्वच धर्माचे लोक त्यांच्या घरादारांसह उद्ध्वस्त झाले. माणसांना न वाचवणारे धर्म आपापसात लढत आहेत. कोणतेही नियम न पाळता युद्ध सुरू आहे. हे धर्मयुद्ध नाही!

Twitter – @rautsanjay61
Email –  [email protected]