ड्रग्ज प्रकरण; … तर शिवसेनेला रस्त्यावर उतरून कठोर पावले उचलावी लागतील, संजय राऊत यांचा इशारा

तीर्थक्षेत्र आणि सुसंस्कृत शहर अशी जगभर ओळख असलेले नाशिक गेल्या काही दिवसांपासून ड्रग्ज, जुगारी आणि गुन्हेगारांचा अड्डा झाले आहे. तरुण पिढी, कुटुंबेच्या कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत. शेकडो तरुण आत्महत्येचा मार्ग पत्करून जीवन संपवत आहेत. नाशिक शहराला नशेखोरी, जुगारी आणि गुन्हेगारीच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून नाशिकमध्ये 20 ऑक्टोबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. त्या मोर्चासाठी शिवसेना पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत नाशिक येथे आले आहेत. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी ‘ड्रग्जचा बाजार थांबला नाही तर शिवसेनेला रस्त्यावर उतरून कठोर पावले उचलावी लागतील’, असा कडक इशारा राज्य सरकारला दिला आहे.

” नाशिक, त्र्यंबकेश्वर सारख्या ठिकाणी ड्रग्जचा, नशेचा बाजार उघड होतोय. हे दुर्दैव आहे. पोलीस, सरकार, पालकमंत्री यांच्या संगनमताने हे होतंय. राज्याच्या दोन प्रमुख मंत्र्यांवर त्या संदर्भात आरोप होत आहेत. त्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही पण नाशिकमधली तरुण पिढी, शाळा कॉलेजची मुलं, मुली या विळख्यात सापडलेले दिसत आहेत. त्यांचे मृत्यू होतायत, त्यांची घरं उद्ध्वस्त होत आहेत. अशा वेळेला नाशिक शहरातल्या प्रमुख नेत्यांची जबाबदारी आहे. यातून काही मार्ग काढावा. पोलिसांवर दबाव वाढावावा. पोलिसांना सर्व माहीत आहे. काही ठिकाणी पोलिसच त्या व्यापारात सहभागी असल्याचे दिसतेय. त्यांना पालकमंत्र्यांचं अभय आहे. ससूनमधून जो पळाला त्यातही पालकमंत्र्यांचं नाव येतंय, ड्रग्जचे कारखाने उद्धवस्त केले त्यातही पालकमंत्र्यांचं नाव येतंय”, अशी टीका संजय राऊत यांनी यावेळी केली.

”यांना महाराष्ट्राचा नायजेरिया, केनिया करायचा आहे. नाशिकचं उडता पंजाब सारखं उडतं नाशिक करायचं आहे. सत्तेसाठी, पैशासाठी किती खालचं टोक आपण गाठतोय हे राज्यकर्त्यांना कळत नाहीए. उद्या शिवसेनेचा सगळ्यात मोठा इशारा मोर्चा निघेल. त्यानंतर हा नशेचा बाजार बंद झाला नाही तर शिवसेनेला रस्त्यावर उतरून कठोर पावले उचलावी लागतील, असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.

तुमच्या अब्रूची लक्तरं आधीच निघाली आहेत

दादा भुसे हे सुषमा अंधारेंवर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार आहेत याबाबत पत्रकारांनी विचारले त्यावर बोलताना संजय राऊत यांनी दादा भुसेंवर टीका केली. ”ससून हॉस्पिटलमधून ज्या ड्रग माफियाचं पलायन झालं का पलायन करण्यात आलं त्यामागे नाशिकचे मंत्री आहेत याचा पहिला आरोप नाना पटोलेंनी व त्यानंतर रविंद्र धंगेकरांनी केला. त्यानंतर सुषमा अंधारेंनी गौप्यस्फोट केला. तेव्हा तुम्ही स्वत:ची अब्रु वाचवण्यासाठी नोटीस पाठवणार असाल तर तुमच्या अब्रूची लक्तरं आधीच निघाली आहेत हे लक्षात घ्या, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

निलम गोऱ्हे कोण?

विधानपरिषदेच्या सभापती निलम गोऱ्हे यांनी केलेल्या टीकेवर बोलताना संजय राऊत यांनी त्यांच्यावर सडकून टीका केली. ”निलम गोऱ्हे कोण? त्यांच्या बोलण्यावर महाराष्ट्राचा विश्वास नाही. ललित पाटील या वक्तीला मी आयुष्यात कधी भेटलेलो नाही. त्याचं नाव मी कधी ऐकलेलं नाही. नंतर माहिती घेतली तेव्हा समजलं की दादा भुसे त्यांना मातोश्रीवर प्रवेशासाठी घेऊन आले होते. तुम्ही फोटो पाहिले तर तुम्हाला समजेल”, असे सणसणीत प्रत्युत्तर संजय राऊत यांनी दिले आहे.