आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजार धडाम, सेन्सेक्स 65 हजारांखाली; निफ्टीतही घसरण

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात लाल निशाण फडकले आहे. सुरुवातीच्या तासाभरातच बाजारात घसरण पहायला मिळाली. सेन्सेक्स 65 हजारांच्या खाली आला असून निफ्टीतही जवळपास .50 टक्के घसरण झाली. यामुळे गुंतवणूकदारांचे कोट्यवधींचे नुकसान झाले.

शेअर बाजारासाठी यंदाचा आठवडा छोटा असणार आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्त बाजार बंद असल्याने या आठवड्यामध्ये चार दिवसच व्यवहार सुरू राहतील. त्यात आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सेन्सेक्स 337 अंक खाली आला. तर निफ्टीतही 110 अंकांची घसरण झाली आणि 19300 वर आला. निफ्टी फिफ्टीमधील फक्त 3 शेअरमध्ये वाढ दिसून आली, तर इतर सर्व शेअरने घसरण नोंदवली.

सेन्सेक्समध्ये टाटा मोटर्सचा शेअर सर्वाधिक 2.44 टक्के घसरला आहे, तर एसबीआयच्या शेअरमध्येही 2 टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली. जेएसडब्ल्यू स्टीलचा शेअर 1.51 टक्के खाली आलाय.

यासह बजाज फायनान्स 1.41 टक्के आणि टाटा स्टीलमध्ये 1.33 टक्क्यांच्या घसरण नोंदवण्यात आली आहे. मात्र ओएनजीसी, एनटीपीसी, कोल इंडिया आणि कोटक महिंद्र बँकेच्या शेअरमध्ये थोडी वाढ झाली आहे.