दिंडोशीतील रस्ते, नालेसफाईची कामे पावसाळय़ाआधी करा! शिवसेनेचा पालिकेकडे जोरदार पाठपुरावा

लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत मुंबईतील अनेक भागांत पावसाळापूर्व कामे रखडलेली असताना दिंडोशी विधानसभा क्षेत्रातही पावसाळा तोंडावर आला असताना वर्षभरापासून खोदलेले रस्ते, तुंबलेले नाले अशीच स्थिती आहे. त्यामुळे पालिकेने पावसाळय़ापूर्वी रस्ते, नालेसफाईची कामे तातडीने पूर्ण करावीत अशी मागणी शिवसेना नेते-आमदार सुनील प्रभू यांनी पालिका प्रशासनाकडे केली आहे.

दिंडोशी विधानसभा क्षेत्र हे बहुतांशी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या उतारावर वसलेले आहे. त्यामुळे अतिवृष्टीत या नागरी वस्तीत पाण्यासोबत मोठमोठे दगड, माती, कचरा धोकादायकरीत्या वाहून येतो. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो. सर्वच ठिकाणी पूरस्थिती निर्माण होऊन रहिवाशांच्या घरात पाणी शिरते. शिवाय रोगराईने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. पूरस्थितीमुळे या ठिकाणची घरे वाहून गेल्याच्या घटनाही घडल्या आहेत. त्यामुळे या विभागातील छोटय़ा आणि मोठय़ा नाल्यांची सफाई पावसाळय़ापूर्वी करा, अशी मागणी आमदार प्रभू यांनी पालिकेकडे केली आहे. याबाबत त्यांनी पायाभूत सुविधा उपायुक्त उल्हास महाले, परिमंडळ-4 चे सहआयुक्त विश्वास शंकरवार यांना पत्र दिले आहे.

रस्त्यांची स्थिती सुधारा
दिंडोशी क्षेत्रात सिमेंट-काँक्रीटीकरण रस्ते करण्याच्या धोरणानुसार काम सुरू आहे. यातील अनेक कामे अर्धवट स्थितीत आहेत. यामुळे पावसाळय़ात या भागात पाणी तुंबण्याचा धोका आहे. त्यामुळे पावसाळय़ापूर्वी दिंडोशीतील रस्ते समतल करणे, सुरू असलेल्या सिमेंट-काँक्रीटीकरणाचे काम वेगाने पूर्ण करून हे रस्ते वाहतुकीसाठी खुले करावेत, अशी मागणीही सुनील प्रभू यांनी केली आहे. या कामांसंबंधी चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.