गुजरातसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री मुनीमगिरी का करतात?

मिंध्यांचे सरकार महाराष्ट्रात आल्यापासून एकेक उद्योग गुजरातमध्ये जातोय. गुजरात काही पाकिस्तानात नाही. तो हिंदुस्थानातच आहे. पण त्या राज्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री मुनीमगिरी का करीत आहेत, असा थेट सवाल शिवसेना पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आज केला. शिंदे हे महाराष्ट्राचे नव्हे तर ठाणे शहराचे मुख्यमंत्री असून मोदी हिंदुस्थानचे नाही तर गुजरातचे पंतप्रधान आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.

छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर ‘मातृतीर्थ ते शिवतीर्थ’ मुक्त संवाद पदयात्रा दाखल झाली. ठाणे हा निष्ठावंत शिवसैनिकांचा बालेकिल्ला असून येथे गद्दारांना कदापिही थारा दिला जाणार नाही. गद्दारांना आता निवडणुकीतच धडा शिकवा, असे आवाहन यावेळी सुषमा अंधारे यांनी केले. शिवसेना नेते व खासदार राजन विचारे यांनीही आपल्या भाषणात गद्दारांचा समाचार घेतला. या वेळी ठाणे लोकसभा संपर्कप्रमुख मधुकर देशमुख, जिल्हाप्रमुख केदार दिघे, प्रभाकर म्हात्रे, द्वारकानाथ भोईर, विठ्ठल मोरे, स्मिता इंदुलकर, रेखा खोपकर, समिधा मोहिते, रंजना शिंदे, अनिश घाडगे, चंद्रभान आझाद, कृष्णकुमार कोळी, सुनील पाटील, नरेश मणेरा, संजय तरे, ज्योती कोळी, आकांक्षा राणे, महेश्वरी तरे, नंदिनी विचारे, एम.के. मढवी, धनश्री विचारे, रोशनी शिंदे, राजन राजे उपस्थित होते.