हिंदुत्वाचा प्रचार केला म्हणून बाळासाहेबांवर बंदी घातली, मग अमित शहांना वेगळा न्याय आहे काय?

अमित शहा यांना माझे एकच सांगणे आहे, देशाचे गृहमंत्री आहात तर केवळ मध्य प्रदेशातील नको, तर देशाच्या कानाकोपऱयातील रामभक्तांना भाजपने अयोध्यावारी फुकट करावी. 22 जानेवारीला राम मंदिराचे उद्घाटन आहे, त्या वेळी 5 ते 10 कोटी लोकांना भाजपवाले फुकट नेतील. पण तसं नको, रामभक्तांची इच्छा असेल तेव्हा त्यांना फुकट अयोध्यावारी घडली पाहिजे.

विलेपार्ल्यातील पोटनिवडणुकीत हिंदुत्वाच्या मुद्दय़ावरून प्रचार केला म्हणून हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मतदानाचा अधिकार काढून घेतला गेला होता. आता पेंद्रीय गृहमंत्री अमित शहा राम मंदिराबाबत बोलले, मग त्यांच्यावर काय कारवाई करणार? आचारसंहितेचे नियम शिथिल केले आहेत का? असा थेट सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पेंद्रीय निवडणूक आयोगाला केला. आचारसंहिता शिथिल केली असेल तर महाराष्ट्रातही ‘जय भवानी जय शिवाजी’, ‘जय श्रीराम’, ‘हर हर महादेव’ आणि राज्यकर्त्यांना सुबुद्धी मिळो म्हणून ‘गणपती बाप्पा मोरया’ असे म्हणून मतदान करा, असे आवाहन त्यांनी तमाम जनतेला केले. 

उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भात निवडणूक आयोगाला पत्र पाठवले आहे. त्याबाबत त्यांनी आज ‘मातोश्री’ निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली. कर्नाटकच्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘बजरंगबली की जय’ बोलून मतदान करण्याचे आवाहन मतदारांना केले होते. आता भाजपला निवडून दिलेत तर अयोध्येत जायचा खर्च येणार नाही, आम्हाला जे मते देतील त्यांना रामलल्लांचे दर्शन फुकट देऊ असे आमिष अमित शहा यांनी मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये मतदारांना दाखवले आहे. त्यावरून उद्धव ठाकरे यांनी शहांबरोबरच निवडणूक आयोगावर निशाणा साधला. पूर्वी अशा गोष्टींची आयोग स्वतःहून दखल घ्यायचा, आताही प्रियंका गांधी, राहुल गांधी, केजरीवाल यांना आयोगाने स्वतःहून नोटिसा पाठवल्या आहेत. म्हणजे निवडणूक आयोग जागरूक आहे, असा सणसणीत टोलाही त्यांनी लगावला. 

1987 मध्ये विलेपार्ल्यात झालेल्या पोटनिवडणुकीचा दाखला यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिला. ते म्हणाले की, भाजप त्या वेळी शिवसेनेविरुद्ध लढला होता आणि शिवसेनेचे डॉ. रमेश प्रभू विजयी झाले होते. हिंदुत्वाच्या म्दुय़ावर लढलेली ती पहिली निवडणूक होती, परंतु पुढे आमचे सरकार येईपर्यंत आमचे पाच ते सहा आमदार बाद ठरवले गेले. त्या वेळी कुणीही हिंदुत्वाबद्दल बोलत नव्हते तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी ‘गर्व से कहों हम हिंदू है’ असा नारा बुलंद केला होता. ‘मंदिर वही बनाएंगे’चे ते दिवस होते. 

विराट आणि हिंदुस्थानच्या संघाने दिवाळी गोड केली 

हिंदुस्थानच्या सेमीफायनलमधील विजयाने आणि विराट कोहलीच्या विक्रमाने यंदाची दिवाळी गोड झाली अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी या वेळी हिंदुस्थानी क्रिकेट संघ आणि विराटचे अभिनंदन केले. आपल्या पिढीतील लोक भाग्यवान आहेत; कारण त्यांनी तीन पिढय़ांचे विक्रमवीर पाहिले. सुनील गावसकर, सचिन तेंडुलकर आणि आता विराट कोहली, असे उद्धव ठाकरे म्हणाले. विराटने शिखर गाठावे, असा विक्रम करावा की, पुढील अनेक वर्षे तो सर्वांना हवाहवासा आणि हेवा वाटावा असा असावा, अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या. 

– हिंदुहृदयसम्राटांचा मतदानाचा अधिकार ज्या नियमाने काढला तो नियम योग्य होता, की आता पंतप्रधान आणि गृहमंत्री करताहेत ते योग्य आहे याचा खुलासा निवडणूक आयोगाने करावा.

भाजपला फ्री हिट आणि आमची हिट विकेट… 

उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर टीकास्त्र सोडले. सत्तेवर आहे म्हणून भाजपला फ्री हिट आणि आम्ही काही बोललो की हिट विकेट काढता, हे अजिबात चालणार नाही, असा खणखणीत इशारा त्यांनी आयोगाला दिला. याला मोकळ्या वातावरणातील निवडणुका म्हणता येणार नाही असेही ते म्हणाले. 

पंतप्रधान ‘बजरंगबली की जय’ बोलून मतदानाचे बटण दाबा असे आवाहन करतात, मग महाराष्ट्रातही ‘जय भवानी जय शिवाजी’, ‘जय श्रीराम’, ‘हर हर महादेव’ आणि राज्यकर्त्यांना सुबुद्धी मिळो म्हणून ‘गणपती बाप्पा मोरया’ म्हणून मतदान करा. 

आचारसंहिता बदलली असेल तर सरकारी भाषेत सर्वांना सांगा

देशाच्या जनतेला आणि आम्हाला उत्सुकता आहे की निवडणूक आयोगाने आचारसंहितेत बदल केला असेल तर तो केव्हा केला आणि तो केवळ भाजपला सांगितला आणि आम्हाला सांगितला का नाही? याबाबत आयोगाने खुलासा करावा अशी आमची मागणी आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. निवडणूक प्रचार संपायच्या आत निवडणूक आयोगाने देशातील सर्व राजकीय पक्षांना आणि मतदारांना या निर्णयाबाबत सरकारी भाषेत अवगत करावे, अशीही मागणी त्यांनी केली.