हिंदुस्थानला भिडण्यासाठी इंग्लंडचे फिरकीअस्त्र

हिंदुस्थानशी पंगा घ्यायचे असेल तर फिरकी गोलंदाजांशिवाय पर्याय नाही याची पुरेपूर कल्पना असल्यामुळे इंग्लंडने आगामी हिंदुस्थान दौऱयासाठी 16 सदस्यीय कसोटी संघांची घोषणा करताना त्यात चार फिरकीवीरांसह टॉम हर्टली आणि शोएब बशीर या नवोदित फिरकीवीरांनाही घेण्याचे धाडस दाखवले आहे.

येत्या 25 जानेवारीपासून पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेला प्रारंभ होत असून इंग्लंडचे नेतृत्व बेन स्टोक्सकडेच कायम ठेवण्यात आले आहे.आगामी हिंदुस्थानी दौऱयातही इंग्लंड आपला आक्रमक बाणा दाखवणार असल्याचे आधीच प्रशिक्षक ब्रॅण्डन मॅकलमने स्पष्ट केले आहे. त्यानुसार हिंदुस्थानी खेळपट्टय़ा या फिरकीला पोषक असल्यामुळे त्यांनी जॅक लीच आणि रेहान अहमद या फिरकी गोलंदाजांसह हर्टली आणि बशीर यांची निवड केली आहे. 20 वर्षीय बशीर समरसेटकडून खेळत असून त्याने पदार्पणाच्या सहा सामन्यांत दहा विकेटस् टिपल्या आहेत.

रेहानने गेल्या वर्षी पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेदरम्यान पदार्पण करताना डावातच पाच विकेटस् घेतल्या होत्या. आता त्याला पुनरागमनाची संधी लाभली आहे. तसेच लीचसुद्धा पाठदुखीतून सावरला आहे. गेल्या काऊंटी मोसमात 20 च्या सरासरीने 20 विकेटस् टिपत संघाला सलग दुसरे अजिंक्यपद जिंकून देणाऱया गस अॅटकिन्सनलाही कसोटी पदार्पण करण्याची लाभणार आहे.

इंग्लंडचा संघ -बेन स्टोक्स (कर्णधार), रेहान अहमद, जेम्स अॅण्डरसन, जॉनी बेअरस्टॉ, शोएब बशीर, हॅरी ब्रुक, जॅक क्राऊली, बेन डकेट, बेन पह्क्स, टॉम हर्टली, जॅक लीच, ऑली पोप, ऑली रॉबिनसन, ज्यो रुट आणि मार्क वूड.

बेन स्टोक्स तंदुरुस्त होणार

वर्ल्ड कप होताच आपल्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करून घेणारा बेन स्टोक्सच संघाचे नेतृत्व करणार आहे. मात्र तो मालिकेपूर्वी पूर्णपणे फिट होऊन गोलंदाजी करू शकेल का याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. स्टोक्स जरी गोलंदाजी करू शकला नाही तरी त्याला स्पेशालिस्ट फलंदाज म्हणून संघात खेळविण्याची मानसिक तयारी व्यवस्थापनाने केली आहे.

अॅशेस मालिकेत आपली जागा निर्माण करण्यात अपयशी ठरलेल्या यष्टिरक्षक फलंदाज बेन पह्क्स आता पुनरागमनासाठी सज्ज झाला आहे. त्याची संघात निवड करण्यात आली असून अनुभवी जेम्स अॅण्डरसन, ऑली रॉबीन्सन, गस अॅटकिन्सन आणि मार्क वूड हे चार स्पेशालिस्ट गोलंदाज खेळणार आहेत.