…तर याचे उत्तर पण द्या! अंबादास दानवे यांचे बावनकुळे यांना सवाल

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यांनी सोमवारी (10 जुलै) नागपुरात पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली होती. ‘नागपूरचा कलंक’ असा उल्लेख केल्यानंतर फडणवीस समर्थक वैतागले. उद्धव ठाकरेंविरोधात त्यांनी आंदोलन छेडलं. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरेंवर टीका केली. त्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी बावनकुळे यांना ट्विटरवरून खरमरीत सवाल केले आहेत.

आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून बावनकुळे यांना अंबादास दानवे यांनी चार सवाल केले आहेत. या प्रश्नांचीही उत्तरं द्या असं आव्हानही केलं आहे.

ट्विटमध्ये अंबादास दानवेंनी, ‘1. प्रत्येकवेळी सरकार स्थापनेसाठी मातोश्रीच्या उंबरठ्यावर का येत होतात?

2. मोदींजींच्या चेहऱ्याशिवाय 63 आमदार निवडून आणून दाखवणाऱ्या माणसाशी सख्य ठेवण्यास का तुमच्या पक्षाची धडपड होती?

3. वयच प्रमाण मानायचे तर फडणवीस यांच्यापेक्षा कमी वयाची माणसे आमदार, खासदार, नगरसेवक म्हणून उद्धव ठाकरे यांनी सभागृहांत पाठवले, हे विसरून कसं चालेल?

4. तुमचे नेते स्वतःचे करियर घडवत होते, कारण त्यांना स्वतःला मोठे व्हायचे होते. उद्धव ठाकरे यांनी माणसं मोठी केलीत. जी रेडिमेड तुम्ही नेलीत आणि सरकार बनवले? हे कसं विसरलात?’, असे सवाल करत भाजपचा दुटप्पीपणा उघडा पाडला आहे.