डिलाईल पुलाचा एकेरी मार्ग गणपतीपूर्वी सुरू करा! आदित्य ठाकरे यांनी केली पाहणी

लोअर परेल येथील डिलाईल पुलाच्या कामाची शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, आमदार आदित्य ठाकरे यांनी आज पाहणी करून आढावा घेतला. गणपतीपूर्वी पुलाचा एकेरी मार्ग पूर्ण करा, अशा सूचना त्यांनी यावेळी महानगरपालिका अधिकाऱ्यांना दिल्या.

डिलाईल पूल हा तिहेरी मार्ग जोडणारा आहे. वरळी आणि प्रभादेवीच्या दिशेने जाणारा मार्ग वाहनांसाठी खुला झाला आहे. मात्र ना. म. जोशी मार्गाकडे येणाऱया मार्गाचे काम अद्याप सुरू आहे. पावसामुळे त्या कामाची गती मंदावली आहे. पूल बंद असल्याने हजारो नागरिक आणि नोकरदार वर्गाची अडचण होत आहे. ज्येष्ठ नागरिकांना करीरोड, ना. म. जोशी मार्गावरून वरळी व प्रभादेवीच्या दिशेने जायचे असेल तर लोअर परेल रेल्वे स्थानकाचे जिने चढून पलीकडे जावे लागते.

याप्रसंगी आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार अजय चौधरी, सुनील शिंदे, विभागप्रमुख आशीष चेंबूरकर तसेच महानगरपालिका अधिकारी उपस्थित होते.

आदित्य ठाकरे यांनी आज या पुलाच्या कामाची पाहणी केली. गणेशोत्सवापूर्वी या मार्गावरील एकेरी लाईन तरी युद्धपातळीवर पूर्ण करून खुली करण्यात यावी, अशा सूचना त्यांनी यावेळी महानगरपालिका अधिकाऱयांना दिल्या.