सत्ताधारी सरकार, लाठीचार्ज सरकार; जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केला संताप

गेल्या दीड महिन्यापासून सुरू असलेली आमदार रोहित पवार यांची युवा संघर्ष यात्रा मंगळवारी नागपूरमध्ये धडकली. संघर्ष यात्रेच्या सांगता सभेनंतर काही रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा विधान भवनाच्या दिशेने नेण्यात आली. मात्र, विधान भवनावर पोहोचण्यापूर्वी नागपुरात पोलिसांनी ही यात्रा अडवून रोहित पवार यांना ताब्यात घेतले. यात्रेची सांगता होत असताना कार्यकर्ते आणि पोलिसांत संघर्ष पाहायला मिळाला. पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केला. त्याचा सर्व स्तरातून निषेध करण्यात येत आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही तीव्र शब्दांत सरकारचा निषेध केला आहे.

सत्ताधारी सरकार = लाठीचार्ज सरकार! वारकरी आणि शेतकऱ्यांवर लाठीचार्ज केल्यानंतर आता राज्यातील युवकांवर पोलिसांचा लाठीचार्ज. सरकारच्या दडपशाही मानसिकतेचा जाहीर निषेध. या सरकारला जनतेच्या प्रश्नांची जराही जाण नाही. पण लोकांनाही आपले प्रश्न संवैधानिक मार्गाने सकारसमोर मांडण्याची मुभा राहिलेली नाही. संवादाला मूठमाती देणाऱ्या ‘लाठीचार्ज सरकारचा’ जाहीर निषेध! असे ट्विट करत आव्हाड यांनी सरकारचा निषेध नोंदवला आहे.

ही यात्रा विधान भवनाकडे जाताना पोलिसांनी अडवल्याने कार्यकर्त्यांनी बॅरिकेट्स तोडून आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तसेच आंदोलकांवर लाठीमार केला. यामुळे काही वेळ वातावरण तणावपूर्ण बनले होते. या संघर्षात काही कार्यकर्ते जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल आहे. रोहित पवार यांच्यासह काही कार्यकर्त्यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. या सर्व प्रकाराचा निषेध करताना रोहित पवार यांनी एक्स या समाजमाध्यमावर सरकारचा निषेध केला आहे. राज्यभरातील युवांनी काढलेल्या युवा संघर्ष यात्रेची धास्ती घेऊन पळ काढणाऱ्या आणि पोलिसांना पुढं करुन बळाचा वापर करणाऱ्या या गोंधळलेल्या, निकामी आणि पळकुट्या सरकारचा तीव्र धिक्कार आणि निषेध! अशा शब्दांत रोहित पवार यांनी निषेध नोंदवला आहे. तसेच आव्हाड यांनीही तीव्र शब्दांत सरकारचा निषेध केला आहे.