Share Market News – सेन्सेक्सने रचला इतिहास, पहिल्यांदाच 70000 पार; निफ्टीतही वाढ

देशांतर्गत शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक BSE सेन्सेक्सने नवीन उच्चांक गाठला आहे. गेल्या आठवड्यापासून सुरू असलेली तेजी आजही दिसून आली आणि दुपारपर्यंत सेन्सेक्स शिखरावर पोहोचला. सेन्सेक्सने पहिल्यांदाच 70 हजारांचा पल्ला पार केला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांची चांदी झाली असून निफ्टीतही वाढ नोंदवण्यात आली.

सोमवारी बाजार सुरु होताच जोरदार खरेदी पहायला मिळाली आणि सेन्सेक्स 85.93 अंकांच्या वाढीसह ओपन झाला. त्यानंतर अवघ्या काही वेळात सेन्सेक्समध्ये 80 अंकांची वाढ झाली आणि थेट 70 हजारांच्या पार पोहोचला. दुसरीकडे निफ्टीही 21 हजार आणि बँक निफ्टी 47350 च्या पार गेला आहे.

शेअर मार्केट सुरु होताच 1901 शेअर्समध्ये तेजी दिसून आली, तर 606 शेअर्समध्ये घसरण दिसली आणि 157 शेअर्समध्ये कोणताही बदल दिसून आला नाही. सोमवारी मार्केट सुरू होताच ओएनजीसी, कोल इंडिया, टेक महिंद्रा, इंडसइंड बँक, स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये तेजी दिसून आली. तर याविपरित डॉ. रेड्डीज लॅब्स, एशियन पेंटस, मारुती सुझुकी, सिप्ला आणि सन फार्मामध्ये घसरण नोंदवण्यात आली.