सतत फोनवर बोलणं, रात्री अपरात्री चॅटींग, विवाहबाह्य संबंधाच्या संशयातून आईचा खून

वसईमध्ये 36 वर्षांच्या महिलेची हत्या करण्यात आली आहे. रविवारी रात्री ही घटना घडली असून पोलिसांनी या महिलेच्या मुलाला ताब्यात घेतले आहे. या मुलाचे वय 17 वर्षे असून तिच्याविरोधात बाल न्याय (काळजी व संरक्षण) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत महिलेचे नाव सुनिता घोगरा असल्याचे सांगण्यात आले आहे.

मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये माजिवली-देपिवली ग्रामपंचायतीसाठी निवडणूक झाली होती. या निवडणुकीत घोगरा सदस्य म्हणून निवडून आल्या होत्या. सुनीता घोगरा यांचा मृत्यू त्यांच्याच मुलाने केलेल्या हल्ल्यात झाल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी या घटनेबाबत बोलताना म्हटले की, हत्येचे नेमके कारण कळाले नसले तरी हत्या करणाऱ्या मुलाचा त्याच्या आईवर राग होता. आपल्या आईचे विवाहबाह्य प्रेमसंबंध असल्याचा त्याला संशय होता.

सुनीता वसई (पूर्व) येथील वालीव येथील एका कारखान्यात काम करत होत्या. रविवारी रात्री 10 च्या सुमारास, त्या आणि त्यांचा मुलगा जेवत होते. आपली आई सतत मोबाईलवर असते, रात्री अपरात्री मेसेज पाठवते याचा मुलाला राग होता. यावरून जेवत असताना दोघांमध्ये भांडणही झालं होतं. जेवण झाल्यानंतर सुनिता त्यांच्या खोलीत झोपायला गेल्या होत्या. त्या झोपेत असताना त्यांच्या मुलाने त्यांच्यावर कुऱ्हाडीने वार करत त्यांना ठार मारले. घटना घडली तेव्हा सुनिता यांचा पती हा कामावर गेला होता. हत्येनंतर मुलगा पळून गेला होता. कामावरून घरी आल्यानंतर सुनिता यांच्या पतीला त्या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसल्या. सुनिता यांना भिवंडीतील इंदिरा गांधी स्मृती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. नंतर त्यांना कळव्यातील रुग्णालयात हलवण्यात आले, तेथे सोमवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला.