फडणवीसांवर रेटून खोटे बोलायचे संस्कार झालेले दिसतात; सुशीलकुमार शिंदे यांचा पलटवार

सोलापूर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूरचा विकास करण्यात काँग्रेस कमी पडली असून सोलापूरचा विकास केवळ भाजप आणि मोदीच करू शकतात, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यावर सोलापूर जिल्हा पारंपरिक दुष्काळी भाग आहे. 45 वर्षांपूर्वी एकमेव उजनी धरण उभारले गेले. सोलापूर जिल्हा ऊस, फळबागा अशा नगदी पिकांच्या माध्यमातून दुष्काळावर मात करत आहे. एकापेक्षा जास्त लहान-मोठी धरणे असायला सोलापूर हे पुणे किंवा नागपूर नाही. देवेंद्र फडणवीस यांना माहिती नसेल किंवा बहुतेक त्याचा त्यांना विसर पडला असावा. देवेंद्र फडणवीस यांच्यावर रेटून खोटे बोलण्याचे भरपूर संस्कार झालेले दिसतात, असा पलटवार सुशीलकुमार शिंदे यांनी केला.

सोलापुरात भाजपचे उमेदवार राम सातपुते यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यानिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप कार्यकर्त्यांची रॅली काढली. या रॅलीला संबोधित करताना देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर टीका केली. या फडणवीस म्हणाले, राम सातपुते गरिबाघरचा आहे. ऊस तोडणी कामगाराचा मुलगा आहे. त्याला हिणवू नका. त्याचा अपमान करू नका. लोकसभेची लढाई ही पंतप्रधान नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी आहे. सोलापूर आणि माढय़ासाठी काही नेते नुकतेच एकत्र आले. या नेत्यांनी सोलापूर जिह्यात सिंचनाची स्वप्ने दाखवली. पण ही स्वप्ने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आम्ही पूर्ण करणार, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार, सुशीलकुमार शिंदे आणि मोहिते-पाटील यांचे नाव न घेता केली. या टीकेवर सुशीलकुमार शिंदे यांनी पलटवार केला आहे.