भाजपला धक्का, 25 वर्षांपासून सोबत असलेल्या अभिनेत्रीने साथ सोडली; वरिष्ठांवर केले गंभीर आरोप

तमिळनाडूमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला आहे. गेल्या 25 वर्षांपासून सोबत असलेल्या महिला नेत्या आणि अभिनेत्री गौतमी तडीमल्ला (Actress Gautami Tadimalla) यांनी भाजप सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. गौतमी तडीमल्ला यांनी एक पत्र लिहित राजीनामा दिल्याची माहिती दिली असून या पत्रामध्ये त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत.

गौतमी तडीमल्ला पत्रामध्ये म्हणतात, काळजावर दगड ठेऊन भाजप सदस्यत्वाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रनिर्माण कार्यामध्ये योगदान देण्यासाठी 25 वर्षांपूर्वी मी पक्षप्रवेश केला. माझ्या आयुष्यात आलेल्या सर्व आव्हानांना तोंड देत मी पक्षाने दिलेल्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. तरीही मी आज आयुष्याच्या अशा टप्प्यावर उभी आहे जिथे मला पक्ष आणि नेत्यांचाही पाठिंबा मिळत नाहीय. अनेक जण माझा विश्वासघात करणाऱ्या लोकांना मदत करण्यात सक्रिय असल्याची माहितीही मला मिळाली आहे.

मी 17 वर्षांची असल्यापासून काम करत आहे. सिनेमा, टेलिव्हिजन, रेडिय़ओ आणि डिजिटलमध्ये मीडियामध्ये 37 वर्ष काम केले आहे. वयाच्या या टप्प्यावर आर्थिकदृष्ट्या सक्षम रहावे आणि मुलीचे भविष्य सुधारावे यासाठी मी आयुष्याभर काम केले. मात्र आज मी अशा टप्प्यावर आहे जिथे मी आणि माझी मुलगी आर्थिकदृष्ट्या सक्षम असायला हवी होती, जीवनात स्थैर्य असायला हवे होते. मात्र सी अलगप्पन यांनी माझे पैसे, मालमत्ता आणि यासह कागदपत्रांचीही हेराफेरी केली असून यामुळे खुप भीती वाटतेय, असा आरोप गौतमी तडीमल्ला यांनी केला.

सी अलगप्पन यांनी 20 वर्षांपूर्वी माझ्याशी संपर्क साधला होता. आई-वडील गमावल्यामुळे मी अनाथ झाले होते. मी सिंगल मदर होते. एकटी, असाह्य असल्याने मी माझ्या जमिनीची आणि इतर कागदपत्र त्यांच्याकडे सोपवली, मात्र त्यांनी माझी फसवणूक केली. मात्र माझ्या कष्टाचे पैसे, मालमत्ता आणि कागदपत्र परत मिळतील अशी मला आशा आहे. माझा पोलिसांवर आणि न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास असून मी तक्रारही दाखल केली आहे. मात्र कारवाईची प्रक्रिया पुढे ढकलली जात नसल्याचे दिसतेय, अशी खंतही गौतमी तडीमल्ला यांनी व्यक्त केली.

2021मध्ये झालेल्या तमिळनाडू विधानसभा निवडणुकीवेळी माझ्याकडे राजपालयम मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली होती. मला तिथून तिकीट देण्याचे आश्वासनही देण्यात आले, मी मेहनत घेतली, तळागाळात भाजपला मजबूत करण्यासाठी काम केले. मात्र शेवटच्या क्षणी मला डावलण्यात आले. तरीही मी पक्षाशी एकनिष्ठ राहिले. मात्र 25 वर्षाच्या निष्ठेनंतरही पक्ष मला पाठिंबा देत नाही, हे धक्कादायक आहे. भाजपने अनेक ज्येष्ठ नेते अलगप्पन यांना मदत करत आहेत. मात्र माझा मुख्यमंत्री, पोलीस खाते आणि न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. तेच मला न्याय देतील, असेही गौतमी तडीमल्ला यांनी म्हटले.

दरम्यान, गौतमी तडीमल्ला आणि अभिनेता कमल हसन हे जवळपास 13 वर्ष लिव-इन रिलेशनमध्ये रहात होते. मात्र 2016मध्ये ते विभक्त झाले.