WI vs India T20 – हारना मना है, टीम इंडियाला आव्हान राखण्यासाठी विजयाची गरज

सलग दोन पराभवांमुळे हिंदुस्थानचा संघ टी-20 मालिका पराभवाच्या उंबरठ्यावर उभा आहे. या टप्प्यावर आता हिंदुस्थानी संघाला हरना मना है, असे म्हणावे लागेल. कारण यजमान विंडीजचा संघ मालिका विजयापासून केवळ एक पाऊल दूर आहे. दुसरीकडे टीम इंडियाची आता जिंका किंवा मराअशी अवस्था झाली आहे. पाच सामन्यांतील या मालिकेतील आव्हान राखण्यासाठी हिंदुस्थानला उर्वरित तीनही सामने जिंकावेच लागणार आहेत. उद्याच्या लढतीत टीम इंडिया मालिकेतील आव्हान राखण्यासाठी मैदानावर जिवाचे रान करताना दिसेल, तर यजमान संघ विजयाच्या हॅट्ट्रिकसह मालिकाविजय साजरा करण्यासाठी सर्वस्व पणाला लावताना दिसेल.

पूरनला रोखण्याची गरज

हिंदुस्थानच्या फिरकी गोलंदाजांना निकोलस पूरनला रोखण्यासाठी रणनीती आखावी लागणार आहे. फॉर्ममध्ये असलेला कुलदीप यादव अंगठय़ाच्या दुखापतीमुळे दुसऱया सामन्यात खेळू शकला नव्हता. तो जर मंगळवारीही खेळला नाही, तर युझवेंद्र चहल व रवी बिश्नोई यांना पूरनला रोखावे लागणार आहे. कारण पूरनने मागील सामन्यात या दोघांचाही सहजतेने सामना केलाय. कर्णधार हार्दिक पंडय़ा व अर्शदीप सिंग या वेगवान जोडगोळीने नव्या चेंडूवर प्रभावी मारा केला, मात्र तिसरा वेगवान गोलंदाज मुकेश कुमार थोडा महागडा ठरला. त्यामुळे उद्या त्याच्याऐवजी आवेश खान किंवा उमरान मलिक यांच्यापैकी एकाला संधी मिळू शकते.

फलंदाजीत आक्रमकतेची गरज

हिंदुस्थानी संघाने मागील दोन्ही लढतीत कमी धावसंख्या उभारली, त्यामुळे विंडीजला विजय मिळविणे सोपे गेले. टी-20 क्रिकेटमध्ये पहिल्या चेंडूपासूनच फटकेबाजीची गरज असते, मात्र ईशान किशन, शुभमन गिल व सूर्यकुमार यादव यांना त्यांच्या लौकिकास साजेशी फटकेबाजी करता आली नाही. दोन्ही लढतीत हिंदुस्थानला 15 ते 20 धावा कमी पडल्या. आघाडीचे फलंदाज अपयशी ठरत असल्याने संजू सॅमसन व तिलक वर्मा या मधल्या फळीतील फलंदाजांवरही दबाव दिसतोय, मात्र तरीही नवख्या तिलकने दोन्ही लढतीत चांगली फलंदाजी केली. हिंदुस्थानची फलंदाजी सहाव्या क्रमांकापर्यंतच असून, सातव्या क्रमांकावर अष्टपैलू अक्षर पटेल खेळतो. त्यामुळे हिंदुस्थानचे शेपूट गुंडाळने विंडीजला सहज शक्य होते.

वेस्ट इंडीज मालिका विजयापासून एक पाऊल दूर, यजमानांचा मालिका जिंकण्याचा निर्धार

आम्ही 2016 नंतर हिंदुस्थानला टी-20 मालिकेत हरवलेले नाही, मात्र, लागोपाठच्या विजयामुळे आमचे मनोबल उंचावले असून, यावेळी आम्ही टीम इंडियाचा विजयरथ नक्कीच रोखू, असा निर्धार वेस्ट इंडीजचा कर्णधार रोव्हमन पॉवेलने व्यक्त केला. विंडीजची आघाडीची फळी अपयशी ठरली तरी निकोलस पूरन व शिमरॉन हेटमायर हे अनुभवी फलंदाज पुन्हा एकदा हिंदुस्थानी फिरकीपटूंवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करतील, एवढे नक्की.

  उभय संघ :

हिंदुस्थान हार्दिक पंडय़ा (कर्णधार), ईशान किशन, शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, उमरान मलिक, आवेश खान, मुकेश कुमार.

वेस्ट इंडीज रोव्हमन पॉवेल (कर्णधार), कायल मायर्स, जॉन्सन चॉर्ल्स, रोस्टन चेस, शिमरॉन हेटमायर, जेसन होल्डर, शाय होप, अकिल होसेन, अल्झारी जोसेफ, ब्रेंडन किंग, ओबेद मॅकॉय, निकोलस पूरन, रोमारियो शेफर्ड, ओडियन स्मिथ, ओशाने थॉमस.