चक्क ‘यमराज’ उतरले निवडणुकीच्या रिंगणात; रेडय़ावरून येऊन भरला उमेदवारी अर्ज

हुकूमशाही गाडण्यासाठी आणि देशात बोकाळलेला भ्रष्टाचार संपवण्यासाठी चक्क ‘यमराज’ निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. माढा लोकसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार राम गायकवाड यांनी आज यमराजाच्या वेषात रेडय़ावरून येऊन आपला अर्ज दाखल केला. ‘देशात बोकाळलेला भ्रष्टाचार संपवण्यासाठी साक्षात यमराजांना यावे लागेल लोकसभेत’ असे पोस्टर घेऊन गायकवाड समर्थकांसह जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले.

उमेदवारी अर्ज भरण्यासाठी राजकीय पक्षांकडून शक्तिप्रदर्शने केली जात आहेत. कुणी सजवलेल्या ट्रकमधून येतोय, तर कुणी बैलगाडीतून वाजतगाजत निवडणूक कार्यालयात पोहोचतोय. उमेदवारांच्या वेगवेगळय़ा वेशभूषाही आकर्षणाचे केंद्र बनले आहे. माढय़ामध्ये राम गायकवाड हे एका गवारेडय़ावर बसून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पोहोचले.

राम गायकवाड हे पंढरपूर येथील राहणारे आहेत. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळालेच पाहिजे असा मुद्दा घेऊन आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरलोय असे त्यांनी सांगितले. देशात बोकाळलेला भ्रष्टाचार आणि हुकूमशाही गाढायची असेल तर यमराजालाच खाली उतरल्याशिवाय पर्याय नाही असे गायकवाड यांच्या समर्थकांनी सांगितले.