तेरणी धरणाच्या भिंतीचे पिचिंग निखळले, धरणाच्या पात्राला झाडाझुडपांचा विळखा; दुरुस्ती करण्याची मागणी

गडहिंग्लज तालुक्यातील तेरणी येथील धरणाच्या भिंतीला करण्यात आलेले दगडी पिचिंग निखळले आहे. धरण पात्रातदेखील मोठय़ा प्रमाणात झाडेझुडपे वाढली आहेत. पाटबंधारे विभागाने या धरणाच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

गडहिंग्लज तालुक्याच्या पूर्वेकडील हलकर्णी भागात तेरणी गाव आहे. या गावचा शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्याच्या दृष्टीने शासनाने 19 जून 1989 रोजी या ठिकाणी लघुपाटबंधारे प्रकल्पाला मान्यता दिली. 1992 साली सर्वेक्षण करण्यात आले. त्यानंतर 1995 साली 50 लाख रुपये खर्च करून हे धरण बांधण्यात आले. या धरणाची ढोबळ पाणीसाठा क्षमता 122. 75 दशलक्ष घनफूट इतकी आहे. तेरणीसह हलकर्णी, कवळीकट्टी, बुगडीकट्टी, चंदनकुड या पाच गावांच्या नळ पाणीपुरवठा योजना याच धरणावर अवलंबून आहेत. गेली दोन-तीन वर्षे हलकर्णी परिसरात पाऊसमान कमीच होत आहे. त्यामुळे हे धरण पूर्ण क्षमतेने भरलेले नाही. सध्या या धरणात 19 टक्के इतका पाणीसाठा आहे. पाच गावांची तहान भागवणाऱया या धरणाच्या देखभाल दुरुस्तीकडे मात्र पाटबंधारे विभागाने दुर्लक्ष केले आहे.

तेरणी धरणाच्या भिंतीला करण्यात आलेले दगडी पिचिंग पूर्णतः निखळले आहे. त्यामुळे भविष्यात भिंतीला धोका निर्माण होऊ शकतो. भिंतीवर झाडेझुडपे मोठय़ा प्रमाणात उगवली आहेत. झाडे व झुडपांच्या मुळांमुळे भिंत खिळखिळी होऊ शकते. गावच्या पश्चिमेकडून वाहणारा ओढा धरणाला जोडण्यात आला आहे. मात्र, या ओढय़ाच्या पात्रातदेखील मोठय़ा प्रमाणात झुडपे वाढली आहेत. या पात्राला झुडपांचा विळखा पडला आहे. पावसाळ्यापूर्वी ही झुडपे हटवण्याची गरज आहे.

धरणातील गाळ काढण्याची गरज

तेरणी धरणात मोठय़ा प्रमाणात गाळ साचला आहे. यामुळे पाणीसाठा कमी होतो. पावसाळ्यात धरण पूर्ण क्षमतेने भरूनदेखील उन्हाळ्यात पाण्याची पातळी झपाटय़ाने खालावते. धरणातील गाळ काढल्यास पाणीसाठा वाढेल व उन्हाळ्यात मुबलक पाणीसाठा शिल्लक राहण्यास मदत होईल.

सुरक्षा चौकी इमारतीची दुरवस्था

धरण परिसरातच पाटबंधारे विभागाने धरणाच्या देखभालीसाठी दोन खोल्यांची चौकी बांधली आहे. मात्र, सध्या या इमारतीच्या देखभालीअभावी दुरवस्था झाली आहे. ही इमारत बेवारस स्थितीत असल्यात जमा आहे. त्यामुळे शासनाने लाखो रुपये खर्च करून बांधलेल्या या इमारतीची डागडुजी करून याचा वापर करण्याची गरज आहे.