पुण्यातील तीन सराईत गुन्हेगार तडीपार, उपायुक्त स्मार्तना पाटील यांची कारवाई

गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या तीन अट्टल गुन्हेगारांवर परिमंडळ दोनच्या पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी तडीपारीची कारवाई केली. आरोपींवर खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, दरोडा असे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

सागर श्रावण पवार-पाटोळे (वय-28, रा. डुक्करखिंड, वारजे), प्रथम उर्फ मनोज विनोद ससाणे (वय-20, रा. भवानी पेठ), गणेश अरुण गायकवाड (वय-24 रा. शंकर महाराज वसाहत, धनकवडी) अशी कारवाई करण्यात आलेल्यांची नावे आहेत. स्वारगेट आणि सहकारनगर पोलिस स्टेशनकडून प्राप्त झालेल्या तडीपार प्रस्तावाची चौकशी केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. तीन जणांना पुणे, पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय आणि पुणे जिल्हयातून तडीपार करण्यात आले आहे.

तडीपार करण्यात आलेले गुन्हेगार हे पोलीस ठाण्याच्या अभिलेखावरील गुन्हेगार आहेत. खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, गंभीर दुखापत, दहशत माजवणे, बेकायदेशीर जमाव जमवणे, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, तोडफोड करणे, शिवीगाळ, मारहाण अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. तसेच रेकॉर्डवरील क्रियाशील गुन्हेगारांवर कायद्याचा वचक रहावा यासाठी संबंधित पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी आरोपींच्या तडीपारीचा प्रस्ताव पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील यांच्याकडे पाठवला होता. प्रस्तावाची चौकशी पुर्ण केल्यानंतर या गुन्हेगारांना हद्दपार करण्यात आले आहे.