मराठी माणसाची ताकद हुकूमशहाला दाखवा! मराठी भाषा दिवसाला उद्धव ठाकरे यांची साद

स्वातंत्र्याशी सूतराम संबंध नव्हता त्यांची गुलामगिरी स्वीकारावी लागते की काय अशी स्थिती देशात आहे. राज्य करणे म्हणजे सूड उगवणे नव्हे असे आजच्या सरकारला सांगितले तर त्याच्यामागे एसआयटी लावतात, ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय सोडतात. अशावेळी आपण केवळ मराठी भाषा दिन साजरा करणार की मराठी माणसाची ताकद हुकूमशहाला दाखवणार हे ठरवण्याची वेळ आली आहे, अशी साद शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मराठी भाषा दिनानिमित्त स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाच्या वतीने मरीन लाईन्स येथील बिर्ला मातोश्री सभागृहात आयोजित विशेष सोहळय़ातून तमाम मराठी जनतेला घातली.

सध्याचे हुकूमशाही सरकार महाराष्ट्र लुटून स्वतःची घरे भरत आहे. राज्यात बेकारी भयंकर वाढतेय. डॉक्टर-औषधांशिवाय रुग्ण मरताहेत. राज्य दुष्काळाच्या उंबरठय़ावर आहे. असे असताना राज्य सरकार केवळ घोषणांचा पाडत आहे. विकासाच्या नावाखाली काँट्रक्टर मित्रासांठी अर्थसंकल्प सादर करून महाराष्ट्र ओरबाडला जात आहे. आता हे थांबवायला हवे. आता क्रांती व्हायलाच हवी. कारण 2024 हे खऱया अर्थाने क्रांतीचे वर्ष आहे. ही अंतिम लढाई आहे. आता हुकूमशाही गाडावीच लागेल, असा वज्रनिर्धार करतानाच महाराष्ट्र लुटणाऱयांना मराठी भाषिकांची ताकद दाखवून द्या आणि छत्रपतींच्या महाराष्ट्रावर गद्दारीचा डाग लावणाऱयांच्या छाताडावर भगवा फडकवा, असे खणखणीत आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.

स्थानीय लोकाधिकार समितीच्या वतीने अनेक वर्षापासून मराठी भाषा दिन साजरा करण्याची परंपरा जोपासली जात असल्याबद्दल त्यांनी गौरवोद्गगार काढले. अनेक आरंभशूर फक्त आरंभ करतात. फोटो काढून झाले की, पळतात, असा टोलाही त्यांनी गद्दारांना लगावला. मात्र शिवसेना तशी नाही. आजच्या दिवसाचा विचार केला तर योगभ्रष्ट नाही तर भ्रष्ट लोकांचेच दिवस आले आहेत. जिकडे पहावे तिकडे भ्रष्ट लोक दिसतात. ‘कान्होबा तुझी घोंगडी चांगली’ या गाण्याप्रमाणे सर्वजण आपल्याच घोंगडीत कसे येतील ते पाहत असल्याचे ते म्हणाले. देशात विचित्र स्थिती. त्यामुळे वर्षातून एकदाच मराठी भाषा दिन साजरा करावा की रोज करावा असा प्रश्न पडतो, असेही ते म्हणाले.

संस्कार खोक्यांनी विकत घेता येत नाहीत
भाषा आपल्याला संस्कार देते आणि मातृभाषेत आपल्याला आईकडून संस्कार मिळतात. माझ्यामध्ये शांत-संयमी नेतृत्व ‘माँ’कडून आलेय आणि शांत राहून कणखरपणे मुकाबला करण्याचे धाडस वडील, आजोबांकडून मिळाल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. शिवसेनाप्रमुख म्हणायचे की अक्षराचे शब्द होतात. शब्दांचे मंत्र होतात. हे भाषेचे धन आहे. शब्दांचे हे धन खोक्यात नाही. ते डोक्यात मावावे लागतात. ते खोक्यांनी विकत घेता येत नाही. भाषा संस्काराचे धन उपजत रक्तात असावे लागते, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

तर महाराष्ट्र, देश संपला म्हणून समजा
कुसुमाग्रजांनी ‘गरजा जय जय कार क्रांतीचा’ असा नारा दिला. पण क्रांती कोण करणार? क्रांती झाली नाही तर देश पुन्हा एकदा गुलामगिरीत जाईल. ती हुकूमशाही, गुलामी इंग्रजांची होती. मात्र आता क्रांती झाली नाही तर ज्यांचा स्वातंत्र्यलढय़ाशी काडीमात्त संबंध नव्हता अशांची गुलामगिरी स्विकारावी लागले. टिळकांनी ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय? राज्य करणे म्हणजे सूड उगवणे नव्हे’ असे ठणकावून सरकारला हादरवून सोडले होते. ही मराठी भाषेची ताकद आहे. मात्र आता असे म्हटले तर एसआयटी, ईडी मागे लावली जाते. त्यामुळे आता मराठी भाषिकांची ताकद हुकूमशहाला दाखवणार का? हे पहिले ठरवले पाहिजे. आजचे चालू वर्ष क्रांतीचे वर्ष आहे. या वर्षी चुकलो, त्यांच्या हाती सत्ता सोपवली तर महाराष्ट्र आणि देश संपला म्हणून समजा असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. क्रांतीचा नुसता जयजयकार नको, क्रांती करायला हवी, असेही ते म्हणाले.

लढाईच्या अंतिम क्षणी, संसाराचा कोश तोडून सामान्यच असामान्य होतात. लढाई जिंकतात. पुन्हा कोशात जातात आणि आपल्या विजयाची मिरवणूक पाहतात, या उक्तीप्रमाणे काम करण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले.

घार गिधाडाचे लक्ष केवळ कुजक्या गोष्टींकडे
सध्याच्या काही नेत्यांची, काही भोक पडलेल्या टिनपाटांची भाषा पाहिली कुसुमाग्रजांचे नाव घ्यायची आपली पात्रता आहे का, असा प्रश्न पडतो, असे ते म्हणाले. सध्या मराठीचा शब्दकोश घ्यायची वेळ आलीय. वेडेवाकडे काहीही बोलले जाते. चांगले वाचायला, ऐकायला मिळत नाही. ब्रेकिंग न्युजमध्ये ज्या काही लोंकांची भाषा ऐकली की ज्ञानोबा, तुकोबांनी दिलेले भाषेचे धन कुठे नेऊन ठेवलेय, असा प्रश्न पडतो. अनेक नेते आज वरच्या भाषेत चांगले बोलतात. प्रत्यक्ष करताना भलतेच करतात. ज्याप्रमाणे घार आणि गिधाड हे उडतात फार उंच. पण त्यांचे लक्ष कुजक्या गोष्टींकडे असते. हीच का ह्यांची गॅरंटी असा टोलाही त्यांनी लगावला. ह्यांचा सत्तेसाठीचा हावरटपणा पाहून तिटकारा येतो. मुह मे राम, बगल मे ईडी अशीच ह्यांची स्थिती आहे, अशीच स्थिती असल्याचे ते म्हणाले.

महाराष्ट्र ओरबाडणाऱयांसोबत का जाऊ?
ज्या संयुक्त महाराष्ट्र लढय़ात माझे आजोबा पहिल्या पाच नेत्यांमध्ये होते. त्यांच्यासोबत माझे वडील, काका त्या लढय़ात उतरले होते. अशा घराण्यात जन्म घेऊन महाराष्ट्र ओरबाडला जात असेल त्यांच्या सोबत का जाऊ, असा सवालही त्यांनी केला. खोके घेऊन त्यांच्यासोबत जाऊ शकलो असतो. मात्र मला खोके नको, मला डोके वापरायचे आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. कुसुमाग्रज, गोविंदाग्रज, राम गणेश गडकरी आदींनी महाराष्ट्राला कणखर देशा, राकट देशा, फुलांच्या देशा, साधूंच्या देशा म्हणून गौरव केला आहे. त्या शिवरायांच्या महाराष्ट्राची ओळख गद्दार, लाचार, गुंड-नशेबांजांच्या देशा अशी होऊ देणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. कारण राज्य टिकले तर भाषा टिकेल आणि भाषा टिकली तर राज्य टिकेल, असेही ते म्हणाले.

लोकमान्य टिळकांनी सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय, असा प्रश्न इंग्रजांना अस्सल मराठीतून विचारला होता. राज्य करणे म्हणजे सूड उगवणे नव्हे असेही त्यांनी ठणकावले होते. ही मराठी भाषेची ताकद आहे आणि हीच ताकद आज आपल्याला दाखवावी लागणार आहे.

कविवर्य गोविंदाग्रजांनी महाराष्ट्राची ओळख दगडांच्या देशा, फुलांच्या देशा, साधुसंतांच्या देशा अशी करून दिली आहे; पण गद्दारांमुळे महाराष्ट्राची ओळख आज गद्दारांच्या देशा, लाचारांच्या देशा, गुंडांच्या देशा, नशेबाजांच्या देशा अशी करून दिली जात आहे.

महाराष्ट्राची अस्मिता, हिंदूंची शक्ती खतम करण्याचा डाव
सर्वोच्च न्यायालयाने चंदीगडच्या बाबतीत जसा निकाल दिला तसाच निकाल आमच्या बाजूने द्यावा अशी आशाही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. कारण सर्वोच्च न्यायालयाने जी चौकट घालून दिली, जी मार्गदर्शक तत्त्वे घालून दिली होती, त्या प्रमाणे लवादाने निकाल दिला नाही. कारण त्यांना शिवसेनेला संपवायचे आहे. मात्र शिवसेना खतम करण्याचा डाव म्हणजे महाराष्ट्राची अस्मिता, हिंदूंची शक्ती खतम करण्याचा डाव असल्याचा घणाघातही केला. यासाठीच मी मैदानात उतरलो आहे. मी मुख्यमंत्री होण्यासाठी नाही तर महाराष्ट्र, देश वाचवण्यासाठी मैदानात उतरलो आहे, असेही ते म्हणाले. सर्वोच्च न्यायालयाने चंदीगडप्रमाणे सत्याच्या बाजूने निकाल देत घटनाबाह्य सरकारची हवा काढून त्यांना रस्त्यावर आणावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.