‘इंडिया’ची मुंबईत बैठक; उद्धव ठाकरे, शरद पवार आज आढावा घेणार

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार ज्याकडे बारीक लक्ष ठेवून आहे त्या ‘इंडिया’ आघाडीची बैठक जवळ आली आहे. भाजपच्या हुकूमशाहीविरुद्ध अनेक राजकीय पक्षांनी एकत्र येऊन बांधलेली ही मोट दिवसेंदिवस मजबूत होत आहे. देशपातळीवरील दोन यशस्वी बैठकीनंतर ‘इंडिया’ची तिसरी बैठक मुंबईत होणार आहे. या बैठकीच्या संपूर्ण तयारीचा आढावा उद्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत घेतला जाणार आहे.

मुंबईत येत्या 31 ऑगस्ट व 1 सप्टेंबरला सांताक्रुझच्या ग्रॅण्ड हयात हॉटेलमध्ये ‘इंडिया’ आघाडीची बैठक होणार आहे. त्या बैठकीला सात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कॅबिनेट मंत्री आणि आघाडीतील 26 राजकीय पक्षांचे राज्य व राष्ट्रीय पातळीवरील नेते उपस्थित राहणार आहेत. त्यांची सुरक्षा, निवास व्यवस्था, भोजन व्यवस्था, वाहतुकीचे नियोजन आदींवर सविस्तर चर्चा करून अंतिम आराखडा बनवण्यात आला आहे.

महाविकास आघाडीतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि आघाडीतील अन्य घटक पक्षांचे नेते रोजच्या रोज या बैठकीच्या तयारीचे नियोजन करत आहेत. उद्या उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे स्वतः ग्रॅण्ड हयातमध्ये उपस्थित राहून बैठकीच्या तयारीचा आढावा घेणार आहेत तसेच पदाधिकाऱयांना सूचना व मार्गदर्शन करणार आहेत.

– सद्य राजकीय परिस्थिती आणि होऊ घातलेल्या आगामी निवडणुका या पार्श्वभूमीवर ‘इंडिया’ आघाडीच्या मुंबईतील बैठकीला विशेष महत्त्व आहे. महत्त्वाच्या मुद्दय़ांवर या बैठकीत चर्चा होणार आहे. तसेच भविष्यातील धोरणे आणि कार्यक्रम ठरवला जाणार आहे. ‘इंडिया’च्या हालचाली वाढल्यामुळे भाजप व अन्य सहकारी पक्ष चिंतेत पडले आहेत.

इंडिया’ आघाडीच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्थेबाबत चर्चा करण्यासाठी महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने मंगळवारी मुंबई पोलीस मुख्यालयात पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची भेट घेतली. शिष्टमंडळात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेना सचिव खासदार अनिल देसाई, राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्षा सुप्रिया सुळे, काँग्रेस आमदार सतेज पाटील, वर्षा गायकवाड, युवा सेना कार्यकारिणी सदस्य साईनाथ दुर्गे, काँग्रेसचे नसीम खान, संजय निरुपम यांचा समावेश होता.