उद्धव ठाकरे यांचा जनसंवाद झंझावात बुलढाणा जिल्ह्यात

राजेश देशमाने, बुलढाणा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जनसंवाद दौर्‍याचा झंझावात दुसर्‍यांदा बुधवारी 20 मार्चला बुलढाणा जिल्ह्यात येवून धडकणार असून ते या दौर्‍यात सिंदखेडराजा व मेहकर येथे जनतेशी संवाद साधणार आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा जनसंवाद दौर्‍याचा झंझावात संपूर्ण महाराष्ट्रात सुरु आहे. काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे बुलढाणा जिल्ह्यात चिखली, मोताळा, जळगाव जामोद येथे जनसंवाद दौरा करून गेले. माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या निधनामुळे मेहकर, सिंदखेडराजा या सभा व दौरा रद्द केला होता. तो राहिलेला दौरा व जनसंवाद सभा उद्या बुधवार 20 मार्च रोजी होत असून उद्धव ठाकरे यांचे सकाळी 11 वाजता संभाजीनगरवरुन सिंदखेडराजा येथे आगमन होणार आहे.

प्रथम ते राष्ट्रमाता जिजाऊ जन्मस्थळी जाऊन दर्शन घेणार आहेत. नंतर सिंदखेडराजा सभेत जनतेशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर ते कारने मेहकरकडे प्रयाण करणार असून मेहकर येथे दुपारी 1 वाजता प्रथम शारंगधर मंदिरात जाऊन दर्शन घेवून नंतर ते मेहकर नगर परिषद कार्यालयासमोरील मैदानात जनतेशी संवाद साधणार आहेत.

सिंदखेडराजा येथील सभेची तयारी शिवसेना सहाय्यक संपर्क प्रमुख छगनदादा मेहेत्री तर मेहकर येथील सभेची तयारी शिवसेना उपजिल्हाप्रमुख आशिष रहाटे व शहरप्रमुख किशोर गारोळे करीत आहे. या सभेला शिवसेना नेते खासदार संजय राऊत, मिलींद नार्वेकर, विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेना सचिव वरुन सरदेसाई, खासदार अरविंद सावंत, संपर्कप्रमुख नरेंद्र खेडेकर उपस्थित राहणार आहेत.म