भाषा वाचवायची असेल तर राज्य वाचवा! उद्धव ठाकरेंचं आवाहन; महाराष्ट्राला लाचार करणाऱ्या मिंध्यावरही शरसंधान

कविवर्य गोविंदाग्रज यांनी महाराष्ट्राची ओळख दगडांच्या देशा, फुलांच्या देशा, साधुसंतांच्या देशा अशी करून दिली आहे. पण, आज गद्दारांमुळे महाराष्ट्राची ओळख आज गद्दारांच्या देशा, लाचारांच्या देशा, गुंडांच्या देशा, नशेबाजांच्या देशा अशी करून दिली जात आहे, अशा शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मिंध्यांवर कडाडले. महाराष्ट्राची अशी ओळख करून दिली जात असताना आपण नुसता मराठी भाषा दिवस साजरा करत बसायचं? नुसता भाषा दिन साजरा करून नाही चालणार, ज्या राज्याची ही भाषा आहे, ते राज्य वाचवण्याची आज गरज आहे, असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. मराठी भाषा, मराठी अस्मिता आणि मराठी संस्कृती टिकवण्यासाठी सदैव झटणाऱ्या स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाच्या वतीने मराठी भाषा गौरव दिवसाचे निमित्ताने मुंबईतील बिर्ला मातोश्री सभागृहात आयोजित केलेल्या सांस्कृतिक सोहळ्यात ते बोलत होते.

सोहळ्याला मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, बऱ्याच दिवसांनी आज एक चांगला कार्यक्रम झाला. इथे दोन गाणी माझ्या कानावर पडली. एक पसायदान आणि दुसरं कान्होबा तुझी घोंगडी. आता कान्होबा तुझी घोंगडी बोलतच नाही, आपल्या घोंगडीत कसे येतील हेच बघतात सगळेजण. संपूर्ण विचित्र झालं आहे. वर्षांतून एकदाच भाषा दिन करावा का, की रोज केला पाहिजे हाही एक प्रश्न पडला आहे. कारण भाषा आपल्याला संस्कार देते. आणि मातृभाषा म्हणजे साहजिकच आईकडून हे संस्कार येतात. तुम्ही माझा जो शांत, संयमी नेतृत्व असा उल्लेख केलात ते अर्थातच माझ्या मांकडून आलेलं आहे. शांत राहून कणखरपणे मुकाबला करतो, ते कुणाकडून आलेलं आहे हे सांगण्याची गरज नाही. साहजिकच आहे वडिलांकडून आलेलं आहे, आजोबांकडून आलेलं आहे. भाषा ही शिवसेनाप्रमुख म्हणायचे तसं अक्षरांचे शब्द होतात आणि शब्दांचे मंत्र होतात. हे भाषेचं धन, शब्दांचं धन खोक्यात मावत नाही, ते डोक्यात मावावं लागतं. हे धन खोक्यांनी विकत घेता येत नाही. खोक्यामधून दुसरं काही आणता येईल पण भाषेच्या संस्काराचं धन आहे, ते उपजतच असावं लागतं, रक्तात असावं लागतं. आणि तशी आपल्यावर संस्कार करणारी आपली भाषा असावी लागते. हल्ली आपण जे काही बघतोय राजकारणी म्हणा किंवा आणखी कुणी म्हणा. कुसुमाग्रजांचं नाव घेण्याची तरी आपली पात्रता आहे का, त्यांनी जे शब्दाचं धन दिलेलं आहे, ते नुसतं एक दिवस साजरं करून होणार नाही. ते शब्द रोज वापरण्याचा प्रयत्न केला, काही हरकत नाही. कारण भाषा इतकी विचित्र होत चाललेली आहे. दुसऱ्या भाषेचा अभ्यास करायचा असेल तर शब्दकोश हातात असावा लागतो. हल्ली बऱ्याच जणांना मराठीचा शब्दकोश हातात ठेवण्याची वेळ आली आहे. कारण वेडवाकडं काहीही बोललं जात आहे. चांगलं काही ऐकायला, वाचायला मिळत नाही. टीव्हीवरच्या ब्रेकिंग न्यूज पाहिल्यानंतर ती भाषा मराठी भाषा आहे, हे बोलायला आपल्याला लाज वाटते. ही मराठी भाषा आहे का, ही ज्ञानोबा तुकोबांची भाषा… यांनी दिलेलं शब्दधन कुठेतरी राहिलंय आणि आपण कुठच्या दिशेने चाललो आहोत, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

‘अर्थसंकल्पावर मी आधीच प्रतिक्रिया दिली आहे, ते पुन्हा सांगत नाही. पण बोलताना काही काही चांगलं बोलून जातात. अनेक नेते आजसुद्धा असे आहेत की बोलताना चांगलं बोलतात पण प्रत्यक्ष करताना मात्र काहीतरी भलतंच करतात. सहज मला रामकृष्ण परमहंसांची गोष्ट आठवली. त्यांच्या एका साधकाने त्यांना विचारलं की का हो गुरुदेव काही लोक बोलतात उच्च पण त्यांची पावलं चुकीची का पडताहेत? (जशी आता आपल्या देशातल्या नेत्यांची पडताहेत) तेव्हा त्यांनी सांगितलं की, लक्षात घे घार आणि गिधाड आकाशात उंच उडतात पण त्यांचं लक्ष कुजलेल्या गोष्टींकडे असतं. म्हणजे मेरी गॅरंटी है असं म्हणणारे लोक आहेत, कसली गॅरंटी तर मला कुजकं मांस पाहिजे. हा सत्तेसाठी चाललेला हावरटपणा पाहून तिटकारा येतो. मुंह मे राम आणि बगलमें ईडी. हे ईडी म्हणजे त्यांचे घरगडीच झालेले आहेत. सगळीकडे धाकदपटशा दाखवून सत्ता पाहिजे, सत्तालोलूपता पाहिजे. चंदिगडमध्ये जे काही घडलं, तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने तिथल्या तिथे निकाल दिला ते बरं झालं. आता आमचीसुद्धा अपेक्षा हीच आहे की सर्वोच्च न्यायालयाने या घटनाबाह्य सरकारची हवा काढून यांना रस्त्यावर आणावं. कारण, सगळ्या घटनाबाह्य गोष्टी घडल्या ते तुम्ही पाहिलेलं आहे आणि तुम्ही निरीक्षण नोंदवलं आहे. तरी देखील इथल्या लवादाने उलटा निर्णय दिला. तुमच्या निरीक्षणाच्या आणि आदेशाबाहेर जाऊन निर्णय दिला. आता लवकर तुम्ही लवकर निकाल दिला पाहिजे. नाहीतर आम्ही प्रत्येक अस्मितेप्रमाणे, गौरवाप्रमाणे दिन साजरे करायचे. पण त्या सगळ्यात महाराष्ट्र आणि देश खालावत चालला आहे. हे मी आजच्या दिवशी का सांगतोय कारण हे गंडांतर केवळ शिवसेनेवर नाही. ही लढाई माझी नाही. मी लढाईला तुमच्यासाठी, महाराष्ट्रासाठी मैदानात उतरलो आहे. शिवसेनाला खतम करण्याचा जो डाव आखलेला आहे, तो महाराष्ट्राची अस्मिता खतम करण्याचा डाव आहे, हिंदुंची शक्ती खतम करण्याचा डाव आहे. महाराष्ट्र ओरबाडून, लुटून न्यायचा आणि स्वतःची घरं भरायची. आजच्या अर्थसंकल्पात मी बोलणार नाही असं बोललं होतो. तरीही मुद्दामहून सांगतो की घोषणा खूप झाल्यात. आपणही दोन ते तीन अर्थसंकल्प मांडले होते. आपण मांडलेले अर्थसंकल्प प्रत्यक्षात आले की नाही. त्यातल्या किती टक्के घोषणा अस्तित्वात आल्या. उघड आहे, त्याचा सुद्धा तुम्ही एकदा सोक्षमोक्ष लावा. पण आज राज्यात उद्योग येत नाहीयेत, बेरोजगारी वाढतेय. दुष्काळाच्या उंबरठ्यावरती आपण आहोत. शेतकरी, अंगणवाडी सेविका आक्रोश करताहेत. अनेक रुग्णालयांत उपचारांशिवाय, औषधोपचारांशिवाय रुग्ण मरताहेत. त्याविषयी कुणालाच काही पडलेलं नाही. पण, सगळीकडे विकासाच्या घोषणांचा इतका पाऊस पाडला. त्यामागे खरं कारण आपल्याला सुविधा देणं हे नाही तर त्यांच्या मित्रांच्या खळग्या भरणं. जे काँन्ट्रॅक्टर आहेत, त्यांच्या तुंबड्या भरण्यासाठी हा अर्थसंकल्प आहे., अशी सणसणीत टीकाही त्यांनी यावेळी केली.

मिंध्यांच्या लाचारीवर आसूड ओढताना उद्धव ठाकरे म्हणाले की, माझा महाराष्ट्र माझ्या डोळ्यांदेखत ओरबाडला जातोय. माझ्या आजोबांनी, वडिलांनी, काकांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत भाग घेतला होता, अशा घराण्यात जन्म घेऊन माझ्या डोळ्यांदेखत मुंबई लुटली जात असेल. महाराष्ट्र ओरबाडला जात असेल तर मी काय त्यांच्या पालख्या वाहायला जाऊ? का मी त्यांच्याविरुद्ध उभा राहिलो आहे? मी त्यांच्यासोबत गेलो असतो तर मला काय खोके मिळाले नसते? पण मला डोकं आहे, मला डोकं वापरायचं आहे, खोके वापरायचे नाहीयेत. आज आपल्या महाराष्ट्राची ओळख करून दिली जात आहे. गोविंदाग्रजांनी केलेलं महाराष्ट्राचं वर्णन वाचल्यावर अंगावर रोमांच उभं राहतं. आपला महाराष्ट्र दगडांचा देश, फुलांचा देश, साधुसंतांचा देश आहे. पण त्या महाराष्ट्राची ओळख आज गद्दारांच्या देशा, लाचारांच्या देशा, गुंडांच्या देशा, नशेबाजांच्या देशा अशी करून देत असतील तर आपण नुसता मराठी भाषा दिवस साजरा करत बसायचं? नुसता भाषा दिन साजरा करून नाही चालणार, ज्या राज्याची ही भाषा आहे, ते राज्य वाचवण्याची आज गरज आहे, अशा शब्दांत उद्धव ठाकरे कडाडले.