गुजरातशासित महाराष्ट्र कदापि होऊ देणार नाही! भाजपच्या पेकाटात पहिली लाथ महाराष्ट्र घालेल!! – उद्धव ठाकरे

माझं घराणं अगदी प्रबोधनकारांपासून, त्यांच्या आधीपासून महाराष्ट्रासमोर आहे; पण अमित शहा, तुमचं, तुमच्या मुलाचं क्रिकेटमधलं असं काय योगदान आहे, ज्यामुळे तो बीसीसीआयचा सचिव बनला? जय शहा विराट कोहलीचा प्रशिक्षक होता का?

महाराष्ट्रातून सगळं काही ओरबाडून गुजरातला नेणार असाल आणि गुजरातशासित महाराष्ट्र करण्याचा तुमचा डाव असेल तर ते आम्ही कदापि होऊ देणार नाही. भाजपच्या पेकाटात पहिली लाथ हा शिवरायांचा महाराष्ट्रच घालेल, असा घणाघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केला. आमचा पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल आकस नाही. आम्ही हुकूशाही आणि एकाधिकारशाहीविरुद्ध लढत आहोत, असे नमूद करतानाच कितीही मोठा हुकूमशहा आला तरी त्याला गाडण्याची ताकद माझ्या महाराष्ट्रात आहे, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.

बुलढाणा लोकसभा मतदारसंघात आज शिवसेनेच्या जनसंवादाचे तुफान पाहायला मिळाले. चिखली, मोताळा आणि जळगाव जामोद येथे उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी भाजप, मोदी सरकार, गद्दार मिंधेंवर उद्धव ठाकरे यांनी कडाडून हल्ला केला. मी गुजराती लोकांच्या विरोधात नाही, पण उघडउघड महाराष्ट्राला ओरबाडून जे गुजरातला नेले जात आहे त्यावर माझा आक्षेप आहे. हे महाराष्ट्र अजिबात सहन करणार नाही. गुजरातला तुम्ही जरूर समृद्ध करा, पण त्यासोबत सगळी राज्येसुद्धा समृद्ध झाली पाहिजेत. तरच आपला देश मोठा होईल, महाशक्ती बनेल, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावले.

भाजपला मतदान करा आणि जुने काँग्रेसवाले आमदार-खासदार करा!

कालपरवा अशोक चव्हाण भाजपात गेले. त्याआधी अजित पवारही भाजपसोबत गेले. निवडणुकीलाही तेच उभे राहणार आहेत. ‘भाजपला मतदान करा आणि जुने काँग्रेसवाले आमदार-खासदार करा’ अशी काही टॅगलाईन भाजपने घेतली आहे की काय, असा खोचक सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. भाजप आणि आरएसएसचे निष्ठावंत कार्यकर्ते पक्षासाठी जी मेहनत घेत आहेत ती कुठे जाणार हेसुद्धा त्यांनी लक्षात घ्यावे, असा सल्लाही उद्धव ठाकरे यांनी दिला. भाजपच्या कार्यकर्त्यांनी ठरवावं, पुन्हा सतरंजीखाली चिरडले जाणार की पेटून उठलेल्या स्वाभिमानी जनतेसोबत राहणार, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

दुष्काळ समोर आ वासून उभा आहे. दोन्ही हंगाम हातचे गेले. पोट भरण्यासाठी लोक शहराकडे धाव घेत आहेत. मुख्यमंत्र्यांनी सरकार दारोदार घेऊन फिरण्यापेक्षा लोकांच्या हाताला काम मिळेल याकडे जरा लक्ष द्यावे, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला.

भाषणाला सुरुवात करतानाच उद्धव ठाकरे यांनी अजित पवारांच्या सभेत बिर्याणी खाण्यासाठी झालेल्या गर्दीवरून टोला लगावला. ते म्हणाले, या देशात आता जिवाला जीव देणारी नव्हेत तर जीव घेणारी माणसे दिसताहेत. सभांना गर्दी जमवण्यासाठी बिर्याणीची लालूच दाखवावी लागते. लोक बिर्याणीवर ताव मारून निघून जातात. शिवसेनेच्या सभेला लोक स्वतःहून येतात. आम्हाला बिर्याणी वाटण्याची गरज पडत नाही.

श्री सदस्यांच्या बळीची चौकशी कधी करणार?

बुलढाणा, हिंगोली, नंदुरबारसह राज्यात काही ठिकाणी अन्नातून विषबाधा झाल्याच्या बातम्या आल्या. वर्षभरापूर्वी ठाण्यातही उन्हाच्या तडाख्याने तसेच गर्दीमुळे श्री सदस्यांचे बळी गेले. या प्रकरणाची चौकशी करणार असल्याचे सरकारने सांगितले होते. कॉन्ट्रक्टरला करोडो रुपये देण्यात आले, त्याचे पोट भरले. पण निष्पापांच्या बळीचे काय? त्यांच्या मृत्यूची चौकशी कधी होणार? इकडेही विषबाधेची घटना घडल्यावर उपचारासाठी डॉक्टर नव्हते, हे काय सरकार आहे का, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

गद्दारांना हमीभाव, पण शेतकऱ्यांना नाही

दिल्लीच्या वेशीवर शेतकरी धडका मारतोय. त्याच्याशी बोलण्याची हिंमत सरकार दाखवत नाही. उलट शेतकऱ्यांना रोखण्यासाठी रस्ते बंद करण्यात आलेत. शेतकऱ्यांवर गोळय़ा चालवल्या जात आहेत. या देशात गद्दारांना 50 खोक्यांचा हमीभाव, पण शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव नाही! असा जोरदार घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.

हुकुमशाही, एकाधिकारशाहीच्या विरोधात

अटलबिहारी वाजपेयी मोदींना कचऱ्याच्या टोपलीत टाकायला निघाले होते तेव्हा शिवसेनाप्रमुखांनी दिलदारी दाखवून त्यांना वाचवले होते. त्यावेळी राजनाथसिंहांनी मला पह्न केला होता. आज राजनाथसिंह यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. मोदींना एक भलामोठ्ठा हार घालण्यात येत असून, त्यात राजनाथसिंह हे डोके घुसवताना दिसत आहेत. पण अमित शहांनी इशारा केल्यामुळे राजनाथ यांना आपले डोके बाहेर काढावे लागले. राजनाथसिंह त्यावेळी अध्यक्ष होते. अध्यक्षांना अशी वागणूक देता. याच हुकुमशाही वृत्तीच्या विरोधात आम्ही आहोत, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

अमित शहा अलीकडेच म्हणाले की घराणेशाही संपवणार. उद्धव ठाकरे यांना त्यांच्या मुलाला व शरद पवारांना त्यांच्या मुलीला मुख्यमंत्री करायचे आहे. हो करायचे आहे, पण जनतेने मते दिली तर होईल ना मुख्यमंत्री. मुख्यमंत्रीपद म्हणजे बीसीसीआयचे पद नाही. तुमचे असे क्रिकेटमधले काय योगदान आहे. जय शहाचे काय कर्तृत्व आहे? मुंबईची फायनल मॅच अहमदाबादला नेणे हे त्याचे कर्तृत्व! असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

यावेळी व्यासपीठावर शिवसेना नेते खासदार संजय राऊत, अरविंद सावंत, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, संपर्कप्रमुख नरेंद्र खेडेकर, सहसंपर्कप्रमुख भास्करराव मोरे, जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, वसंतराव भोजने, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, वरुण सरदेसाई आदींची उपस्थिती होती.

जनतेला घर दिलं, छप्पर दिलं म्हणता पण आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाचं छप्पर उडालं आहे. काय चाटायचंय तुमचं प्रधानमंत्री आवास योजनेतलं घर? तुमचा संपूर्ण भाजप जळून खाक होईल एवढी ताकद माझ्या महाराष्ट्रात आहे.

एकदा सामना होऊनच जाऊ द्या

बुलढाण्यासह राज्यात अनेक ठिकाणी दुष्काळी परिस्थिती आहे. पण सरकार अजगरासारखे सुस्त पडले आहे. गेल्या आठवडय़ात अवकाळी पाऊस झाला. आपले सरकार असतानाही नैसर्गिक आपत्ती आल्या. पण त्यावेळी सगळे काम बाजूला ठेवून अगोदर लोकांपर्यंत मदत पोहोचवण्याचे काम केले. दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ केले. नुसती घोषणा केली नाही, तर प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणीही करून घेतली. हिंमत असेल तर मैदानात या, एकदा होऊनच जाऊ द्या सामना! लोकांनाच विचारा कुणाचे सरकार चांगले होते ते, असे आव्हानच उद्धव ठाकरे यांनी मिंध्यांना दिले.

महाराष्ट्रातली जिद्द गेली कुठे?

उत्तरेतला शेतकरी हक्कासाठी रस्त्यावर उतरला आहे. दीड वर्षापूर्वी याच शेतकऱ्यांनी मोदी सरकारला झुकवले होते. याला म्हणतात जिद्द! महाराष्ट्रातील ही जिद्द गेली कुठे? सिंदखेडराजा हे जिजाऊसाहेबांचे जन्मस्थान.  जिजाऊंनी आपल्याला दैवत दिले, त्या दैवताने आपल्याला अन्यायाविरुद्ध लढण्याची ऊर्जा, ताकद दिली. आपण हेच विसरलो तर काय उपयोग. जिजाऊंचे जन्मस्थान असलेल्या या पावन भूमीतील शेतकरी जर आत्महत्येकडे वळत असेल तर यापेक्षा मोठे दुर्दैव ते कोणते? आत्महत्या करणे हा उपाय नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

गद्दारांना हमीभाव, 50 कोटी!

या देशात गद्दारांना हमीभाव आहे, 50 कोटी! पण गोरगरीब शेतकऱ्यांच्या पिकांना हमीभाव नाही, ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे. ही लढाई शेतकऱ्यांची, त्यांच्या हक्काची आहे. ही लढाई महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची असल्याचे शिवसेना नेते खासदार संजय राऊत म्हणाले. बुलढाणा जिल्हय़ात जनसंवाद सभेत बोलताना खासदार राऊत यांनी भाजप सरकारवर टीकेची झोड उठवली. तळपत्या उन्हात सभेला झालेली गर्दी पाहून त्यांनी येथून शिवसेनेचा निष्ठावंत शिलेदारच लोकसभेवर निवडून जाईल, असा विश्वास व्यक्त केला. शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा उल्लेख करून खासदार संजय राऊत म्हणाले की, दिल्लीच्या सीमेवर शेतकरी न्याय मागत आहे. पण या न्याय मागणाऱ्या शेतकऱ्यांवर मोदी सरकारने गोळय़ा चालवल्या. या हुकूमशाहीविरुद्ध आज बुलढाण्यातून एल्गार सुरू झाला आहे. अन्याय, ढोंगाला लाथ मारा. शिवसेनाप्रमुखांचा ज्वलंत विचार घेऊन आपल्याला महाराष्ट्र पुढे न्यायचा आहे. त्यामुळे परिवर्तन करून शिवसेनेचा भगवा डौलाने फडकवा.

दिलेल्या वचनाला जागला असता तर अडीच वर्षे शिवसेनेचा आणि अडीच वर्षे तुमचा टरबूज, पपई, कलिंगड… जो कोण आहे तो मुख्यमंत्री झाला असता. आता तुम्हाला या पाच वर्षांत काय मिळालं? पह्डापह्डी करून उपऱ्यांना डोक्यावरती घेऊन तुम्हाला नाचावं लागतंय. तुमची आणखी काय दशा आणि दुर्दशा होणार माहीत नाही.