उन्मुक्त चंदचा पत्ता कट

टी-20 वर्ल्ड कपसाठी निवडण्यात आलेला अमेरिकेचा निम्मा संघ हिंदुस्थानी असला तरी हिंदुस्थानच्या युवा वर्ल्ड कप संघाचा कर्णधार उन्मुक्त चंदचा पत्ता कट करण्यात आला आहे. तसेच आगामी पॅनडाविरुद्धच्या मालिकेसाठीही त्याला संघात स्थान मिळू शकलेले नाही.  त्यामुळे आगामी टी-20 विश्वचषकातील त्याच्या सहभागाबाबतदेखील प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

आगामी टी-20 विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर यूएसए संघाने तयारी सुरू केली असून पॅनडाविरुद्ध ते पाच टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू कोरी अँडरसनला यूएसएने संघात स्थान दिले आहे. 2018 मध्ये कोरी अँडरसनने न्यूझीलंडसाठी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. 2020 मध्ये तो अमेरिकेत स्थलांतरित झाल्याने तो आता अमेरिकेच्या संघात खेळताना दिसणार आहे. पॅनडाविरुद्धच्या मालिकेबरोबरच कोरी आगामी टी-20 विश्वचषकात अमेरिकेच्या संघात दिसेल. अमेरिकेच्या संघात सामील झाल्यापासून कोरी अँडरसन याने 28 डावांत 900 धावा केल्या आहेत.त्याच्याबरोबर हिंदुस्थानच्या अंडर-19 विश्वचषक संघातील माजी खेळाडू हरमीत सिंग यालादेखील अमेरिकेने संघात स्थान दिले आहे.

हिंदुस्थानी क्रिकेटमध्ये भवितव्य धुसर झाल्यामुळे अमेरिकेत आपले क्रिकेट करिअर घडवण्यासाठी गेलेल्या उन्मुक्त चंद याच्या पदरी पुन्हा निराशा आली आहे. मायनर लीगच्या मोसमात चमकदार कामगिरी करूनदेखील त्याला पॅनडाविरुद्धच्या टी-20 मालिकेतील संघात स्थान देण्यात आलेले नाही. चंदच्या नावावर 45 डावांमध्ये दीड हजारापेक्षा अधिक धावा आहेत.