उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक वेळेवरच! मुख्य निवडणूक आयुक्तांचे संकेत

कोरोना नियमांच्या चौकटीत राहून विधानसभा निवडणूक घेण्याची मागणी सर्वच राजकीय पक्षांनी केली आहे. त्यामुळे ही निवडणूक वेळेवर आणि भयमुक्त वातावरणात होईल, असे संकेत मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्र यांनी दिले. या निवडणुकीत वृद्ध दिव्यांगांना घरूनच मतदान करण्याची मुभा देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

उत्तर प्रदेश विधानसभेची मुदत मेमध्ये संपत आहे. फेब्रुवारी व मार्चमध्ये विधानसभेची निवडणूक घेण्याची तयारी प्रशासनाने चालवली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्र यांनी आयोगाचे अधिकारी अनुपचंद्र पांडेय, उमेश सिन्हा, राजीव कुमार यांच्यासमवेत निवडणूक तयारीचा आढावा घेतला. उत्तर प्रदेशातील सर्व जिल्हाधिकारी, पोलीस प्रशासनाशी निवडणूक आयोगाने चर्चा केली. त्यानंतर राज्यातील सर्व राजकीय पक्षांची बैठक घेतली. या बैठकीत सर्वच राजकीय पक्षांनी निवडणूक वेळेवर घेण्याची मागणी केल्याचे सुशील चंद्र यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. पाच जानेवारी रोजी अंतिम मतदार यादी येणार आहे. त्यानंतर पुढील प्रक्रिया होईल असे ते म्हणाले.

निवडणुकीच्या अनुषंगाने आम्ही आरोग्य विभागाशीही चर्चा केली आहे. त्यांनी कोरोना नियमांचे काटेकोर पालन करण्यावर भर दिला. काही राजकीय पक्षांनी जाहीर सभांमध्ये कोरोनाचे नियम पायदळी तुडवण्यात येत असल्याचा उल्लेख केला. या सर्व बाबींवर पुन्हा गांभीर्याने विचार करण्यात येईल, असे सांगत असतानाच सुशील चंद्र यांनी निवडणूक वेळेवरच होणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले.

या निवडणुकीत 80 वर्षांवरील वृद्ध व दिव्यांगांना घरूनच मतदान करण्याची मुभा देण्यात येणार आहे. राज्यात 800 मतदान केंद्रांवर फक्त महिला कर्मचारी असतील, अशी माहिती यावेळी सुशील चंद्र यांनी दिली. मतदान केंद्रावरील कर्मचाऱयांचे लसीकरण झालेले असेल तसेच मतदानाची वेळही एक तासाने वाढवून देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.