IPL 2024 – कोलकात्याचा झंझावाती विजय; अय्यर जोडीमुळे 19 चेंडू राखून विजय

आघाडीवीरांनी केलेल्या घणाघाती खेळींमुळे कोलकात्याने बंगळुरूविरुद्ध झंझावाती विजयाची नोंद केली. बंगळुरूच्या 183 धावांच्या आव्हानाची हवा 17 व्या षटकांतच काढताना कोलकात्याने 7 विकेट राखून सलग दुसऱ्या विजयासह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी झेप घेत घरच्या मैदानांवर यजमानांच्या विजयाची मालिका दहाव्या सामन्यात खंडित केली. गेल्या नऊ सामन्यांत यजमान संघांनीच विजयाचा जल्लोष साजरा केला होता. अष्टपैलू कामगिरी करणारा सुनील नरीन सामनावीर ठरला.

बंगळुरूच्या 183 धावांचा पाठलाग करताना कोलकात्याने एका दमात विजयी लक्ष्य गाठले. फिल सॉल्ट (30) आणि सुनील नरीनने (47) 6.3 षटकांतच 86 धावा ठोकत आपल्या विजयाचा मार्ग सुकर केला. त्यानंतर व्यंकटेश अय्यर (50) आणि कर्णधार श्रेयस अय्यरने (नाबाद 37) तिसऱ्या विकेटसाठी 75 धावांची भागी रचली आणि मग श्रेयसने संघाच्या सलग विजयावर शिक्कामोर्तब केले.

त्याआधी नोंद विराट कोहलीच्या 59 चेंडूंतील 83 धावांच्या नाबाद खेळीच्या जोरावर बंगळुरूने कोलकाताविरुद्धच्या सामन्यात 6 बाद 182 अशी दमदार मजल मारली. श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकत बंगळुरूला फलंदाजीला बोलावले. विराटने पहिल्या चेंडूपासून आक्रमक फलंदाजी केली, पण त्याला कर्णधार फाफ डय़ु प्लेसिसची साथ लाभली नाही. मात्र त्यानंतर पॅमेरून ग्रीन (33) आणि ग्लेन मॅक्सवेलबरोबर 65 आणि 40 धावांची भागी रचत संघाला सव्वाशेसमीप नेले. मात्र रजत पाटीदार आणि अनुज रावत अवघ्या  3 धावा करून बाद झाल्यामुळे बंगळुरूची धावगती मंदावली. अखेर दिनेश कार्तिकने तीन षटकार खेचत संघाची धावसंख्या 182 पर्यंत ताणली. त्याने 8 चेंडूंत 20 तर विराटने 4 चौकार आणि 4 षटकार ठोकत नाबाद 83 धावा फटकावल्या.