लाठीचार्ज हे गृहविभागाचे अपयश, फडणवीस यांनी राजीनामा द्यावा; विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांची मागणी

जालन्यात मराठा समाजाच्या आंदोलकांवर झालेला लाठीचार्ज हे गृहविभागाचे अपयश आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा. तसेच संपूर्ण प्रकरणाची निपक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

जालन्यातील आंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सनदशीर मार्गाने सुरू असलेले आंदोलन गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पोलिसांनी रझाकारी मार्गाने चिरडले. सकाळी आंदोलकांशी चर्चा करणाऱया पोलिसांनी दुपारी आंदोलकांवर घेरून अमानुष लाठीहल्ला केला. आंदोलक तरुणांसह महिला, लहान मुले, वृद्धांवर रक्तबंबाळ होईपर्यंत पोलिसांनी लाठय़ा चालवल्या. यावेळी तुफान दगडफेक झाली. यात अनेकजण जखमी झाले. पोलिसांपासून वाचण्यासाठी आंदोलकांनी राम मंदिरात धाव घेतली. पोलिसांनी अश्रुधुराचा बेसुमार वापर केला. एवढेच नाहीतर हवेत गोळीबार करून प्रचंड दहशत निर्माण केली. या घटनेवरून वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर तीव्र शब्दांमध्ये टीका केली.

जालन्यातील घटना गृहविभागाचे अपयश असून या घटनेची जबाबदारी घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा. मराठा समाजाचे शांततेत आंदोलन सुरू होती. आंदोलनाला पाठिंबा वाढत होता आणि त्यामुळे हे आंदोलन चिरडण्यासाठी सरकारने बळाचा वापर केला, असा आरोप वडेट्टीवार यांनी केला.

निवडणुकीआधी दंगली घडवण्याचे सरकारचे कारस्थान, पहिली ठिणगी जालन्यात टाकली; संजय राऊत यांचा घणाघात

जालन्यातील लाठीहल्ला हा सरकारचा क्रूरपणा आहे. या घटनेचा निषेध करतो. मराठा समाजाला आरक्षण देतो म्हणून त्यांची फसवणूक करण्याचे काम या सरकारने केले आहे. 50 टक्के आरक्षणाची मर्यादा वाढवल्याशिवय आरक्षण देता येणार नाही, हे माहिती असताना सुद्धा खोटे बोलवून मत घेतली. हक्कासाठी रस्त्यावर उतरणे गुन्हा नाही. मराठा समाजाला फसवणाऱ्यांना मराठा समाज माफ करणार नाही. सरकारने मराठा समाजाची माफी मागितली पाहिजे. ज्यांनी कार्यकर्त्यांना मारहाण करून जखमी केले त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली.


तसेच मराठा समाजाला आरक्षण देणार की नाही, हे सरकारने स्पष्ट करावे. गेल्या वर्षभरापासून सरकार केवळ फोडाफोडीचे राजकारण करण्यात व्यस्त आहे. या नादात सरकारचे मराठा समाजाकडे दुर्लक्ष झाले आहे. सरकारची मराठा समाजाला आरक्षण देण्याची माणसिकताच नसल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला.